Join us  

ICC CWC 2023: टीम इंडिया फॉर्मात, विश्वविजेतेपद दृष्टीक्षेपात, पण...

ICC CWC 2023 Final, Ind Vs Aus: स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा यजमान संघ आणि तितकाच जबरदस्त रेकॉर्ड आणि झुंजार ऑस्ट्रेलियन संघ. यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना हा खऱ्या अर्थाने महामुकाबला ठरणार आहे.

By बाळकृष्ण परब | Published: November 17, 2023 8:34 PM

Open in App

- बाळकृष्ण परबतारीख १९ नोव्हेंबर २०२३, स्थळ गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेटमधील दोन दिग्गज संघ आमने-सामने येणार आहेत. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा यजमान संघ आणि तितकाच जबरदस्त रेकॉर्ड आणि झुंजार ऑस्ट्रेलियन संघ. यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना हा खऱ्या अर्थाने महामुकाबला ठरणार आहे. रोहित शर्माचं नेतृत्व, विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म, बुमराह-शमीचा विद्ध्वंसक तोफखाना आणि त्यांना इतर सहकाऱ्यांकडून मिळत असलेली साथ, स्पर्धेत अजेय राहत फायनलपर्यंत केलेली वाटचाल, यामुळे यंदा वर्ल्डकप आपणच जिंकणार, असा विश्वास क्रिकेटप्रेमींना आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पहिल्या दोन सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर पुढचे सगळे सामने जिंकत कांगारू फायनलपर्यंत पोहोचले आहेत, त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात काहीशी चिंता आहे. त्याला कारणंही तसंच आहे. ते कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत निर्माण केलेला दबदबा.

ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा विश्वचषक जिंकलाय. तर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ऑस्ट्रेलियाची ही आठवी वेळ आहे. त्यात केवळ दोन वेळा त्यांचा पराभव झालाय. १९९९ पासून आजपर्यंत एकूण चारवेळा ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचलाय आणि या चारही वेळा  त्यांनी विजय मिळवलाय. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव हा १९९६ मध्ये झाला होता. त्यावेळी श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया साधली होती. पण त्यानंतर मात्र प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ दबदबा राखून खेळलाय. एक काळ तर असा आला होता जेव्हा वर्ल्डकप मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघ आपला पराभव निश्चित समजत असत. जर कुणी आव्हान दिलंच तर ते मोडून काढण्यासाठी ऑसी फौजेतील कुणी ना कुणी उभं राहायचं. पण आज परिस्थिती बदललेली आहे. स्टीव्ह वॉ, रिकी पॉंटिंग यांचे ते जबरा संघ इतिहासजमा झालेत‌. आजचा ऑस्ट्रेलियन संघ हा अजिंक्य अजेय वगैरे काही नाही. तो स्टीव्ह वॉच्या संघासारखा चतूर, धूर्त नाही आणि रिकी पाँटिंगच्या संघासारखा खुनशीही नाही. मात्र या संघामध्ये उपजत जिद्दी वृत्ती आणि चिवटपणा मात्र आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य लढतीत त्यांनी तो गुण दाखवून दिला आहे. त्यामुळे रविवारी अहमदाबादमध्ये भारतीय संघाला जोपर्यंत सामन्याचा निकाल निश्चित होत नाही तोपर्यंत सावध राहावं लागणार आहे.

तसं पाहिलं तर गेल्या काही काळात ऑस्ट्रेलियन संघाला तोडीस तोड कामगिरी भारतीय संघानं केलीय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला गारद करत आपल्या अभियानाची दणक्यात सुरुवात केली होती. तेव्हापासून रोहित शर्माच्या भारतीय संघानं स्पर्धेत मागे वळून पाहिलेलं नाही.  यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी सर्वात सातत्यपूर्ण झालेली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने साखळीतील सर्वच्या सर्व आणि उपांत्य लढत असे सलग १० सामने जिंकत अंतिम फेरीत धडक दिली आहे. वर्ल्डकपचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड भारताविरोधात चांगला असला तरी २०११ नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या ४ पैकी ३ सामने भारताने जिंकले आहेत. त्यात २०११ च्या वर्ल्डकपमध्ये याच अहमदाबादमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने विजय मिळवला होता. एवढंच नाही तर या वर्ल्डकपपूर्वी झालेल्या द्विपक्षीय मालिकेत भारताच्या नवख्या संघाने ऑस्ट्रेलियाची धुलाई केली होती. त्यामुळे आपण ऑस्ट्रेलियाल सहज नमवू हा आत्मविश्वास भारतीय संघाच नक्कीच असेल.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता संपूर्ण भारतीय संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यात कर्णधार रोहित शर्माचं विशेष कौतुक करण्यासारखं आहे. रोहित सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी गोलंदाजीवर आक्रमण करून संघासाठी धडाकेबाज सुरुवात करून देत आहे. त्याला शुभमन गिलची सुरेख साथ मिळत आहे. विराट कोहली तर भारतीय फलंदाजीचा कणा बनला आहे. तर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या तुफानी खेळीने मधल्या फळीच्या कामगिरीचा प्रश्न मिटवला आहे. सूर्यकुमारला मात्र त्याच्या फलंदाजीचं तेज दाखवण्याची फारशी संधी मिळाली नाही. तर अष्टपैलू जडेजाने गोलंदाजी आणि संधी मिळेल तेव्हा फलंदाजीत आपली ताकद दाखवलीय. आता अंतिम सामन्यातही भारताची सर्वाधिक मदार ही रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरच असेल. तसेच जर ऑस्ट्रेलियाचा पाडाव करून विश्वविजेते व्हायचे असेल तर या दोघांपैकी एकाला मोठी खेळी करावी लागणार आहे. 

तर गोलंदाजीमध्ये यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपल्याकडे आतापर्यंतचं सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज अशी तगडी गोलंदाजी आणि कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे फिरकीपटू यामुळे भारताची गोलंदाजी फळी मजबूत आहे. मात्र अंतिम सामन्यामध्ये सहाव्या गोलंदाजाची उणीव टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. तसेच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीत खेळपट्टीकडून साथ मिळेनाशी झाल्यावर आणि विल्यमसन-मिचेलची जोडी जमल्यावर काही काळ आपले गोलंदाज काहीसे हतबल झालेले दिसले. त्यात काही झेलही सुटताना दिसले. आता अंतिम फेरीत या गोष्टी टाळाव्या लागतील. कारण अशी मिळालेली एकही संधी ऑस्ट्रेलियन संघ सोडत नाही. 

दुसरीकडे पहिल्या दोन सामन्यातील दारुण पराभवांचे धक्के पचवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने या स्पर्धेत जबरदस्त खेळ केला आहे. हा संघ अजेय नसला तरी त्यांना पराभूत करणंही तितकंस सोपं नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरपासून ते ग्लेन मॅक्सवेलपर्यंत प्रत्येक फलंदाजाने ऑस्ट्रेलियन संघासाठी गरजेच्या वेळी योगदान दिलेलं आहे. मधल्या फळीत अनुभवी स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनची फलंदाजी मात्र त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यात ऑस्ट्रेलियन्स वेगवान गोलंदाजी चांगली खेळतात. त्यामुळे आपल्या गोलंदाजांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. अंतिम लढतीपूर्वी मिचेल स्टार्कसह ऑस्ट्रेलियाच्या इतर वेगवान गोलंदाजांना सूर सापडला आहे. साखळी सामन्यात स्टार्क आणि हेझलवूडने आपली अवस्था ३ बाद २ अशी बिकट केली होती. हेही विसरून चालणार नाही. बाकी कांगारूंचा फिरकी मारा तसा यथातथा आहे. स्पर्धेत सर्वाधिक बळी टिपणाऱ्यांच्या यादीत असलेला अॅडम झॅम्पा डोकेदुखी ठरू शकतो. 

एकंदरीत सलग दहा सामने जिंकल्यानंतर अंतिम फेरीत आपल्याला स्पर्धेतील खरं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. घरचं मैदान, जवळपास सव्वा लाख प्रेक्षकांचा एकमुखी पाठिंबा, अनुकूल वातावरण, सातत्यपूर्ण कामगिरी अशी सगली समिकरणं टीम इंडियासाठी अनुकूल असणार आहेत. मात्र विश्वचषक उंचावण्यासाठी त्या दिवसाची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. बाकी अंतिम सामन्याचा दबाव न घेता नेहमीप्रमाणे खेळ केला, तर विश्वचषक उंचावण्यापासून आपल्याला कुणीही अडवू शकणार नाही. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावन डे वर्ल्ड कपरोहित शर्माविराट कोहली