सलग दहा सामने जिंकून आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुसंडी मारणाऱ्या भारतीय संघाला काल फायनलमध्ये ऑष्ट्रेलियाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे देशभरात निराशेचं वातावरण पसरलं आहे. तसेच भारतीय संघातील खेळाडूंनाही आपली निराशा आणि दु:ख लपवणं कठीण जात आहे. दरम्यान, २०११ च्या वर्ल्डकपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने केलेला कामगिरीचं कौतुक करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
पराभवानंतर भारतीय संघासाठी केलेल्या खास ट्विटमध्ये गौतम गंभीर म्हणाला की, ‘’मी म्हटल्याप्रमाणे आमचा संघ विजेता संघ आहे. त्यामुळे तुम्ही मान ताठ ठेवा. ऑस्ट्रेलियन संघाला खूप खूप शुभेच्छा’’. काल झालेल्या अंतिम सामन्यात अपेक्षित कामगिरी करण्यात भारतीय संघाला यश आले नव्हते. त्यामुळे काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ विकेट् राखून आरामात विजय मिळवला होता.
काल झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर भारताची फलंदाजी निराशाजनक झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना चांगल्या सुरुवातीचं मोठ्या खेळीत रूपांतर करता आलं नाही. त्यामुळे भारताला ५० षटकांमध्ये केवळ २४० धावाच करता आल्या. तर ट्रॅव्हिस हेडने ठोकलेल्या झंझावाती शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना सहा विकेट्सने सहज जिंकून सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा केला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आपले अश्रू लपवू शकला नाही. विराट कोहली, मोहम्मद सिराज यांनाही अश्रू अनावर झाले होते.