Join us  

Ind Vs Ned: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ

ICC CWC 2023, Ind Vs Ned: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामने आज संपणार असून, आज होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताची गाठ नेदरलँडशी पडणार आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 1:51 PM

Open in App

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामने आज संपणार असून, आज होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताची गाठ नेदरलँडशी पडणार आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला असून, फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या आधीच्या सामन्यातील संघांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

यजमान भारतीय संघ या विश्वचषक स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असून, भारताने गटसाखळीत खेळलेले आतापर्यंतचे सलग ८ सामने खेळले आहेत. तर आता नेदरलँड्सवर मात करून सलग नववा विजय नोंदवण्याचा भारताचा इरादा आहे. आज विजय मिळवल्यास भारतीय संघ २००३ विश्वचषक स्पर्धेतील सलग आठ विजय मिळवण्याचा विक्रम मोडू शकतो. 

तर दुसरीकडे नेदरलँडच्या संघाने या विश्वचषक स्पर्धेत दोन विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त खेळ करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवर साखळीमध्ये नेदरलँडने सनसनाटी विजय मिळवला होता. तर बांगलादेशवर मात करत नेदरलँडने स्पर्धेत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली होती. 

दरम्यान, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये असून, आज एका  मोठा विक्रमाला गवसणी घालण्यासाठी रोहित शर्माला केवळ १२ धावांची गरज आहे. आज १२ धावा काढल्यावर रोहित शर्मा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत एका खास क्लबमध्ये दाखल होईल. रोहित शर्माने या विश्वचषक स्पर्धेमध्ये जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे. या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदा आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये ५५.२५ च्या सरासरीने ४४२ धावा काढल्या आहेत. तर विराट कोहलीने ५४३ धावा काढल्या आहेत. आता नेदरलँडविरुद्ध १२ धावा काढताच रोहित शर्माच्या नावे खास रेकॉर्ड होणार आहे.

रोहित शर्माने आज नेदरलँडविरोधात १२ धावा काढल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १४ हजारांहून अधिक धावा काढणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत रोहित शर्माचा समावेश होणार आहे. या आधी भारतासाठी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या दोघांनाच हा पराक्रम शक्य झाला आहे. 

दोन्ही संघ पुढीलप्रमाणेभारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

नेदरलँड्स - मॅक्स ओ’डाऊड, वेस्ली बेरेसी, कॉलिन एकरमन, एस. एंगलब्रेच, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), बास डी लीडे, तेजा निदामनुरू, लोगन वॅन बीक, रोल्फ वॅन डर मोर्वे,  आर्यन दत्त, पॉल वॅन मीकरेन.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा