ICC CWC 2023: नेदरलँड्सकडून बांगलादेशी वाघांची शिकार, वर्ल्डकमध्ये केली दुसऱ्या विजयाची नोंद

ICC CWC 2023: यंदाच्या वर्ल्डकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या नेदरलँड्सने स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद केली. माफक धावसंख्येचा बचाव करताना नेदरलँड्सने बांगलादेशवर ८७ धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 09:26 PM2023-10-28T21:26:30+5:302023-10-28T21:45:33+5:30

whatsapp join usJoin us
ICC CWC 2023: Netherlands Beats Bangladesh by 87 Runs, record second World Cup win | ICC CWC 2023: नेदरलँड्सकडून बांगलादेशी वाघांची शिकार, वर्ल्डकमध्ये केली दुसऱ्या विजयाची नोंद

ICC CWC 2023: नेदरलँड्सकडून बांगलादेशी वाघांची शिकार, वर्ल्डकमध्ये केली दुसऱ्या विजयाची नोंद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यंदाच्या वर्ल्डकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या नेदरलँड्सने स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद केली. माफक धावसंख्येचा बचाव करताना नेदरलँड्सने बांगलादेशवर ८७ धावांनी विजय मिळवला. नेदरलँड्सने दिलेल्या २३० धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १४२ धावांत गारद झाला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील नेदरलँड्सचा हा दुसरा विजय ठरला आहे. 

दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या सनसनाटी विजयामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सचा संघ चर्चेत आला होता. नेदरलँडने पुढच्या सामन्यात श्रीलंकेलाही झुंजवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सला ३०९ धावांनी पराभूत करत या नवख्या संघाला धक्का दिला होता. मात्र या धक्क्यातून सावरत नेदरलँड्सने आज झुंजार खेळ केला आणि आपल्यापेक्षा तुलनेने तुल्यबळ असलेल्या बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. 

बांगलादेशने केलेल्या तिखट माऱ्यासमोर नेदरलँड्सचे फलंदाज अडखळले होते. मात्र निर्धारित ५० षटकांमध्ये सर्व गडी गमावून २२९ धावांपर्यंत मजल मारण्यात त्यांनी यश मिळवले. त्यानंतर माफक धावसंख्येचा बचाव करताना नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आर्यन दत्तम लिटन दासला (३) बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर बांगलादेशच्या डावाला गळती लागली. मेहदी हसन मिराज (३५), महमदुल्लाह (२०) आणि मुस्तफिजूर रहमान (२०) यांचा अपवाद वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. अखेर बांगलादेशचा संपूर्ण संघ १४२ धावांत गारद झाला. नेदरलँड्सकडून पॉल मिकरेनने ४, डी लीडे याने २ तर आर्यन दत्त, वॅन बिक आणि एकरमन यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडची सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती. मात्र कर्णधार स्कॉट एडवर्ड्सची ६८ धावांची झुंजार खेळी आणि एंगलब्रिच (३५) आणि वॅन बिक (नाबाद २३) यांच्या समयोचित खेळीच्या जोरावर नेदरलँड्सने निर्धारित ५० षटकांमध्ये सर्वबाद २२९ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशकडून शोरिफूल इस्लाम, तस्किन अहमद, मेहदी हसन आणि मुस्तफिजूर रहमान यांनी प्रत्येकी दोन तर शकिब अल हसनने एक बळी टिपला.

Web Title: ICC CWC 2023: Netherlands Beats Bangladesh by 87 Runs, record second World Cup win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.