Join us  

पाऊस पुन्हा मदतीला धावणार, पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचवणार? समोर येतेय अशी माहिती

ICC CWC 2023: यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये खेळणाऱ्या दोन संघांची नावं निश्चित झाली आहेत. तर ऑस्ट्रेलियाही जवळपास उपांत्य फेरीमध्ये पोहोचला आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या संघांमध्ये चुरस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 3:58 PM

Open in App

यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये खेळणाऱ्या दोन संघांची नावं निश्चित झाली आहेत. तर ऑस्ट्रेलियाही जवळपास उपांत्य फेरीमध्ये पोहोचला आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या संघांमध्ये चुरस आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पावसाने पाकिस्तानला मदत केली होती. दरम्यान, आता उपांत्य फेरी गाठण्यासाठीही पाऊस पाकिस्तानला साथ देण्याची शक्यता आहे.

उपांत्य फेरी गाठण्यासाठीची पाकिस्तानची वाट अजूनही म्हणावी तशी सोपी नाही आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात वर्ल्डकपमध्ये खेळत असलेल्या पाकिस्तानने आठ सामन्यांमध्ये ४ विजयांसह ८ गुण मिळवले आहेत. न्यूझीलंडचेही ८ सामन्यांमधून ८ गुण आहेत. मात्र खराब खराब नेट रनरेटमुळे पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड आपला शेवटचा साखळी सामना ९ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. तर पाकिस्तान आपला शेवटचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. या दरम्यान, बंगळुरूमधून पाकिस्तानसाठी दिलासादायक बातमी येत आहे. 

अॅक्यू वेदरने दिलेल्या माहितीनुसार ९ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये ७४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर पावसामुळे सामना रद्द झाला तर श्रीलंका आणि न्यूझीलंडला प्रत्येकी एक एक गुण मिळेल. याआधी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत पावसामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. त्याचा फटका न्यूझीलंडला बसला होता. तर डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावंनी विजय मिळवत पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली होती.

दरम्यान, न्यूझीलंडचा श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर न्यूझीलंडचे ९ सामन्यांमधून ९ गुण होतील. अशा परिस्थितीत इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला तर पाकिस्तानचा संघ १० गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. अफगाणिस्तानच्या खात्यामध्येही ८ गुण आहेत. मात्र त्यांचे पुढील सामने हे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानचा मार्ग तितकासा सोपा नसेल. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडसह श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानलाही कमी लेखून चालणार नाही. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानन्यूझीलंड