- बाळकृष्ण परबघरच्या मैदानावर होत असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. काल श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ३५७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर तब्बल ३०२ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने आपण कुठल्याही संघाला चारीमुंड्या चीत करून विजय मिळवण्यास सज्ज असल्याचा इशारा दिलाय. सलग सात सामने जिंकत आपण विजयाचे सप्तरंग उधळलेत, त्यामुळे आता वर्ल्डकप आपल्यासाठी अवघ्या चार पावलांवर आला असल्याची भावना क्रिकेटप्रेमींमध्ये आहे. मात्र ही चार पावलं आपल्यासाठी तितकीच आव्हानात्मक ठरणार असल्याची जाणीव आपल्याला ठेवावी लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी आलेला कटू अनुभव.
सलग सात सामने जिंकल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता रोहितसेनेला स्पर्धेतील निर्णायक ठरणाऱ्या नॉकआऊट लढतींकडे आपलं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मात्र तत्पूर्वी होणाऱ्या गटसाखळीतील उर्वरित दोन लढतीही महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यात आपली गाठ दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स या संघांशी पडणार आहे. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने एका सामन्याचा अपवाद वगळता इतर सर्व लढतींमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. तर नेदरलँड्सच्या संघांने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दोन धक्कादायक निकाल नोंदवले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे.
स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाची एकंदरीत कामगिरी चांगली झालीय. आघाडीच्या फळीची फलंदाजी, वेगवान मारा आणि फिरकी गोलंदाजी अशा सर्वच क्षेत्रात आपल्या संघानं कमाल केलीय. काल श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्मा झटपट माघारी परतल्यावर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी दमादर फलंदाजी केली. पण दोघांचीही शतकं हुकणं कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना हुरहूर लावून गेलंय. विशेषकरून विराट कोहलीचं शतक. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कर्मभूमीतच त्याच्या सर्वात मोठ्या विक्रमाशी बरोबरी झाली असती तर तो आगळावेगळा योग ठरला असता. असो. पण गिल आणि विराटच्या धडाकेबाज फलंदाजीनंतर भारताची मधली फळीही पेटून उठलेली दिसली. श्रेयस अय्यरने तुफानी खेळी करत त्याच्या टीकाकारांची तोंडं बंद केलीत. तर रवींद्र जडेजानेही एक उपयुक्त खेळी करत आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय.
आपल्या वेगवान माऱ्याच्या सध्याच्या फॉर्मचं वर्णन तर शब्दातही न करता येण्यासारखं. बुमराह, सिराज, शमी यांचं वेगवान त्रिकूट सध्य़ा जगातील कुठल्याही फलंदाजीला उद्ध्वस्त करू शकतं, असं चित्र आहे. काल या तिघांनीही पहिल्या पाच सहा षटकांमध्येचं लंकेचं काम तमाम करून टाकलं. फलंदाजीला साथ देणाऱ्या वानखेडेच्या खेळपट्टीवर या त्रिकुटानं श्रीलंकेच्या फलंदाजांना एकेक धाव घेणं कठीण करून टाकलं होतं. या वेगवान माऱ्यासमोर जेमतेम पन्नाशी गाठता आली, हेच श्रीलंकन संघ आपलं नशीब मानत असेल.
आता रविवारी होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा भारतीय संघासाठी उपांत्य आणि अंतिम फेरीची रंगीत तालीम ठरणार आहे. त्याची कारणं म्हणजे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्याच संघाने टीम इंडियाखालोखाल सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. तसेच एकंदरित परिस्थिती बघता हाच संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत भारतीय संघासमोर उभा ठाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लढतीतील भारतीय संघाची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
मात्र मागच्या दोन विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेतल्यास भारतीय संघ हा प्राथमिक फेऱ्यांचे अडथळे अगदी आरामात पार करून बाद फेरीत पोहोचला होता. मात्र गेल्या दोन्ही वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीमध्ये जाऊनच आपण अडखळलो होतो. २०१५ मध्ये प्राथमिक फेरीपासून उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सर्व सामने जिंकल्यानंतर आपण उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालो होतो. तर २०१९ मध्येही प्राथमिक फेरी गाजवल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत आपली फलंदाजी अडखळली होती. दोन्ही वेळा आव्हानाचा पाठलाग करताना आपल्या फलंदाजांनी घात केला होता अन् विश्वविजयाचं स्वप्न भंगलं होतं. पण यंदा विश्वचषक घरच्या मैदानावर होत असल्याने आणि आपण सलग ५ सामने पाठलाग करताना जिंकलेले असल्याने ही समस्या जाणवेल, असं वाटत नाही.
घरची मैदानं, फॉर्ममध्ये असलेली फलंदाजी, आग ओकत असलेली वेगवान गोलंदाजी आणि प्रतिस्पर्धी फलंदाजींची फिरकी घेणारे फिरकी गोलंदाज, अशी सगळी समिकरणं जुळून आली आहेत. आपला स्टार फलंदाज विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर शुभमन गिल, मधल्या फळीत श्रेयस अय्यर असे सगळेच कामगिरीत सातत्य दाखवत आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराय यांनी तर वेगवान गोलंदाजीत कहरच केलेला आहे. त्यांना रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची चांगली साथ लाभत आहे. त्यामुळे प्राथमिक फेरीतल्या उर्वरित दोन लढती आणि पुढे उपांत्य आणि अंतिम लढत, असं विश्वविजेतेपद अगदी चार पावलांवर आलंय. मात्र ही चारही पावलं आपल्याला अगदी जपून आणि तोलून मापून टाकावी लागणार आहेत. मग विश्वविजेतेपद आपलंच!