आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही आता रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. यादरम्यान, आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या रिकी पाँटिंगने मोठं भाकित केलं आहे. रोहित शर्मा घरच्या मैदानावर भारताला विश्वचषक जिंकून देऊ शकतो, असे रिकी पाँटिंग यांने म्हटले आहे. सलग तीन सामने जिंकून भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्या अभियानाची दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानवर सहज विजय मिळवला होता. तर तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता.
रिकी पाँटिंगने यावेळी रोहित शर्माचंही कौतुक केलं. तो म्हणाला की, ’रोहित शर्मा अगदी बेफिकीर चिंतारहीत आहे. तो विचलित होत नाही. त्याच्या खेळामध्येही हे दिसते. तो जबरदस्त फलंदाज आहे. तसेच मैदानाच्या आत आणि बाहेरही निश्चिंत दिसतो’. रोहित शर्माने डिसेंबर २०२१ मध्ये विराट कोहलीच्या जागी भारताचं नेतृत्व स्वीकारलं होतं. आता रोहितच्या नेतृत्वाखाली विराट कोहली आपल्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित करू शकतो, असे रिकी पाँटिंगने सांगितले.
रिकी पाँटिंगने पुढे सांगितले की, विराट कोहली हा खूप जिद्दी खेळाडू आहे. तो प्रशंसकांचे ऐकतो. त्यांना उत्तरही देतो. त्याच्यासारख्या व्यक्तींना असं काम थोडं कठीण असतं. तर रोहित शर्मा उत्तम खेळाडू आहे. तसेच तो नेतृत्वही चांगल्या प्रकारे करत आहे’. भारताने यापूर्वी २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी भारताने श्रीलंकेवर मात केली होती.
पाँटिंगने पुढे सांगितले की, स्वत:च्या देशामध्ये खेळत असताना चांगल्या कामगिरीचा दबाव असतो. मात्र रोहित शर्मा या दबावाचा सामना करण्यास सक्षम आहे. भारतावर अपेक्षांचा दबाव नसेल, असं म्हणता येणार नाही. नक्कीच असा दबाव असेल. मात्र रोहित शर्मा या दबावाचा सामना करू शकतो. भारताकडे खूप गुणवान संघ आहे. त्यांची वेगवान गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी, आघाडीची फलंदाजी, मधली फळी सगळं जबरदस्त आहे. त्यांना पराभूत करणं कठीण आहे, असे रिकी पाँटिंगने सांगितले.