- गायत्री वर्तक-मडकेकर(क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ)अनेकदा आपण एखादी गोष्ट सलगपणे यशस्वी करत असतो आणि तीच गोष्ट मोक्याच्यावेळी आपल्याकडूनच बिघडलीही जाते. हेच आपण क्रिकेट विश्वचषकात पाहिले. विजयरथावर स्वार असलेला भारत फायनलमध्ये पराभूत झाला. अशावेळी निराशा येणे स्वाभाविक आहे; पण त्यातून पुढे वाटचाल करणेही महत्त्वाचे आहे. इथून आपण सर्वच गमावलंय किंवा आता आपण जिंकूच शकणार नाही, असा विचार करणे चुकीचे आहे.
मी तो सामना जिंकण्यात अपयशी ठरलो आणि मी अपयशी आहे, यामध्ये खूप मोठा फरक आहे. वैयक्तिकरीत्या विचार केल्यास मी अपयशी ठरल्याचा विचार येतो; पण त्याचवेळी मी अपयशी नाहीये, मी फक्त तो सामना किंवा तो प्रसंग गमावला हा विचार केला पाहिजे. त्यामुळे सलग दहा सामने जिंकल्यानंतर आपल्या संघाकडून पुन्हा विजयाची अपेक्षा ठेवणे हे चुकीचे ठरले. कारण, आधीच्या विजयी कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी त्याचवेळच्या उत्साहाची, ऊर्जेची गरज भासणार होती आणि या गोष्टी सातत्याने एकसारख्या टिकून राहत नाहीत.
भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा होतीच; पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, आज जिंकलो किंवा सलग विजय मिळवले, म्हणजे आपण कायम जिंकणार असे होत नाही. हार-जीत होतच असते. स्पर्धेत सुरुवातीला आपण ऑस्ट्रेलियाला नमवले होते, याचा अर्थ आपण कायम त्यांना हरवू असाही होत नाही. तसेच, त्यांच्याकडून आपण हरलो म्हणजे कायम त्यांच्याकडून हरणार असाही होत नाही. आपल्या आयुष्यातही अशा प्रकारचे अनुभव येतात. पूर्ण तयारी करून आपण जिंकत जात असतो आणि मोक्याच्या क्षणी अपयश आपल्या नशिबात येते. त्यातून ओव्हरकम करताच आले पाहिजे.. आणि ते येतेही... त्यासाठी आपण तयार असले पाहिजे.
टेन्शन घ्यायचे की नाही? - अनेकदा सहजपणे म्हटलं जाते की, टेन्शन घेऊ नये. खरं म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही हे म्हणणंच चुकीचं आहे. कारण, यामुळे समोरची व्यक्ती गोंधळून जाते आणि त्या व्यक्तीला स्वत:च्या क्षमतेबाबत शंका येते. - मी नको त्या गोष्टीचा दबाव घेतोय का? मी मानसिकरीत्या इतका खचलोय का, असे प्रश्न त्या व्यक्तीला पडतात. हे सर्व नकळतपणे घडत असते. सकारात्मक विचारापेक्षा मदतशीर विचार करणे महत्त्वाचे आहे. - यासाठी मेडिटेशन नाही; पण श्वासावर नियंत्रण राखणे शिकले पाहिजे, जास्तीत जास्त वर्तमानकाळात राहावे. - साधारणपणे दडपणामध्ये आपला श्वास वेगळ्याच स्तरावर जातो. आपण अशा स्थितीत नेहमी नकारात्मक विचार करतो. - आपल्याला काय जमत नाही, आपलं काय चुकतंय, याचा विचार आपण पटकन करतो; पण आपल्याला काय येतं, आपण कशात तरबेज आहोत याबाबत कोणताही विचार करत नाही.- त्यामुळे अशा छोट्या- छोट्या गोष्टींचा विचार करण खूप महत्त्वाचे आहे.
दडपणाकडे आव्हान म्हणून पाहादडपण ही एक नकारात्मकता आहे. खरं म्हणजे दडपण आपण स्वत:हून आपल्यावर लादून घेतो. जर तुम्ही एखादे काम चांगल्याप्रकारे केले तर ते सातत्य टिकवण्यासाठी आणखी दबाव येतो. अशावेळी तुमच्याकडून अपेक्षा असतात; पण जर तुम्ही चांगले काम केलेच नाही, तर तुमच्याकडून कोणी अपेक्षाच ठेवणार नाही. माझ्यामते अव्वल दर्जाच्या खेळाडूंना हे चांगल्याप्रकारे माहीत असते. हे खेळाडू दडपणाला आव्हानाच्या दृष्टीने पाहतात. महत्त्वाचे म्हणजे दडपण अशावेळी येते जेव्हा चांगली कामगिरी होत नसते. जिथे खूप अपेक्षा असतात तिथे दडपण असते; पण दरवेळी चांगली कामगिरी होईल, हेही तर्कशुद्ध नाही. कठीण काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. अशा काळामध्ये पाठिंबा देणे खूप महत्त्वाचे ठरते.