- अयाज मेमन
कन्सल्टिंग एडिटर
अमेरिका संघाकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. भारताविरुद्ध रविवारी न्यूयॉर्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘महामुकाबल्या’दरम्यान निश्चितपणे दडपण असेल ते पाकिस्तानवरच! आणखी एक पराभव झाल्यास त्यांचा सुपर एटचा प्रवास थांबू शकतो. दुसरीकडे मागच्या ११ वर्षांपासून आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी आतुर असलेला भारतीय संघ आयर्लंडवर मात करीत आत्मविश्वासाने सज्ज झालेला दिसतो. भारताने बाजी मारल्यास अ गटात भारत आणि अमेरिकेचे ४-४ गुण होतील तर पाकचे गुणांचे खातेही उघडणार नाही.
आयपीएलच्या मानसिकतेतून बाहेर पडा
पाकविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची सकारात्मक वृत्ती निर्णायक ठरणार आहे. सर्वच जण आयपीएल खेळून अमेरिकेत दाखल झाले. आयपीएलमध्ये सर्वांनी चौकार- षटकारांची आतषबाजी केली. पण येथे परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ड्रॉप इन खेळपट्टीवर आयपीएलसारखी फटकेबाजी शक्य नाही. असे केले तर पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे होईल. झटपट धावा काढण्याच्या नादात २० षटकांआधीच डाव संपुष्टात येऊ शकतो. आक्रमक खेळायचे आहेच; पण विकेटही शाबूत ठेवावी लागेल. ड्रॉप इन खेळपट्टीवर १७०-१८० धावा आव्हानात्मक ठरू शकतील.
पाक पुनरागमनाचा प्रयत्न करणार
कागदावर टीम इंडिया बलाढ्य वाटतो. मैदानातही भारत वरचढ जाणवतो. स्पर्धेत आव्हान टिकविण्यासाठी पाकिस्तान संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू शकतो. शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, मोहम्मद आमिर आणि नसीम शाह हे वेगवान गोलंदाज अमेरिकेविरुद्ध लौकिकानुसार कामगिरी करू शकले नाहीत. खेळपट्टीचा चौघेही लाभ घेण्याचा प्रयत्न करतील. भारतीय फलंदाजी लयीत आहेत. अशावेळी पाकच्या गोलंदाजांनी बेशिस्त मारा केल्यास भारतीय फलंदाज त्यांना सळो की पळो करून सोडतील.
खेळपट्टी समजून घ्या...
दडपण झुगारून जो संघ खेळेल त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे. याशिवाय न्यूयॉर्कमध्ये आणखी एक पैलू मोलाचा असेल. खेळपट्टीच्या स्वरूपाविषयी चर्चेला उधाण आले आहे. येथे ड्रॉप इन खेळपट्टी आहे. ॲडिलेडमधून खेळपट्ट्या येथे आणण्यात आल्या. या स्पोर्टिंग विकेट मुळीच नाहीत. गोलंदाजांना याचा भरपूर लाभ होतो. फलंदाज धावा काढण्यासाठी घाम गाळतात. भारत पाकच्या तुलनेत दडपण चांगल्याप्रकारे झुगारू शकेल, मात्र खेळपट्टीचे दडपण दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरेल. जो संघ येथे फलंदाजी-गोलंदाजीत ताळमेळ साधेल, त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असेल.
परिस्थितीवर नियंत्रण गरजेचे
नाणेफेक जिंकल्यास फलंदाजी घ्यावी की, गोलंदाजी हादेखील प्रश्न आहेच. टी-२० अनेक संघ लक्ष्याचा पाठलाग करणे पसंत करतात. लक्ष्य आणि खेळपट्टीचे पुरेसे आकलन तोपर्यंत झालेले असते. लक्ष्याचा पाठलाग करणे म्हणजे विजय निश्चित होणे, असे मुळीच नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पराभव पदरी पडू शकतो. गोलंदाजीत प्रभावी कामगिरीच्या बळावर प्रतिस्पर्धी संघाला लवकर गुंडाळणे ही विजयाची पहिली पायरी ठरू शकेल.
रोहित- विराट सलामीला
कर्णधार रोहित सोबत विराट कोहली डावाची सुरुवात करणार आहेत. संघ व्यवस्थापनाने फलंदाजी क्रम निश्चित केला असून त्यात बदलाची शक्यता कमीच आहे. एखादा फलंदाज जखमी झाल्यास काहीअंशी बदल होऊ शकतील. आयर्लंडविरुद्ध रोहितने अर्धशतकी खेळी केली तर विराट एक धाव काढून बाद झाला होता. पण विराटच्या क्षमतेवर शंका घेण्याचे कारण नाही. फॉर्ममध्ये असलेला यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर खेळेल.
बाबरची जबाबदारी वाढली
दुसरीकडे पाकची फलंदाजी फारच कुचकामी ठरली. कर्णधार बाबर आझम स्वत: फॉर्ममध्ये नाही. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक गचाळ कामगिरी करीत असताना बाबर आझमची जबाबदारी वाढली. त्याला दडपणाखाली नेतृत्व करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल. तो स्वत: दडपणाखाली येतो, असे नेहमी घडले आहे.
फिरकी गोलंदाज निष्प्रभावी
फिरकीबाबत सांगायचे तर पाकिस्तान संघ फारच अपयशी ठरला. शादाब खानच्या कामगिरीत सातत्य नाही. चेंडू अचूक वळण घेऊ शकेल, असा टप्पा त्याला शोधता आलेला नाही. इमाद वसीम याला भारताविरुद्ध संधी मिळेल का, याबाबत शंका आहे. तो अमेरिकेविरुद्धही अंतिम संघात नव्हता. पाकचा गोलंदाजी मारा नेहमीसारखा कागदावर भेदक वाटतो आहे, पण सातत्याअभावी सर्वच गोलंदाज भरपूर धावा मोजताना दिसतात.
Web Title: ICC CWC T20, Ind Vs Pak: 'Stormy Encounter', Mighty India take on Weakened Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.