Join us  

कसोटी क्रिकेटमध्ये टॉस कायम राहणार

अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 10:30 AM

Open in App

मुंबई: अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या समितीनं कसोटी क्रिकेटमधील नाणेफेक कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेक हा पारंपारिक क्रिकेटमधील अविभाज्य घटक असल्याचं समितीनं म्हटलंय. कोणता संघ प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करणार, याचा निर्णय नाणेफेकीच्या माध्यमातून होतो. बहुतांश सामन्यांमध्ये नाणेफेकीचा कौल अतिशय महत्त्वाचा ठरलाय. त्यामुळेच कसोटी क्रिकेटमधील नाणेफेक कायम राहिल.कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंच्या कौशल्याचा कस लागतो. याशिवाय त्यांच्या संयमाचीदेखील परीक्षा पाहिली जाते. अनेकदा मायदेशात खेळणारा संघ त्यांना अनुकूल अशी खेळपट्टी तयार करुन घेतो. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेत खेळणाऱ्या पाहुण्या संघाच्या अडचणीत भर पडते. त्यामुळेच नाणेफेक रद्द करण्याचा विचार पुढे आला होता. थेट पाहुण्या संघाला फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याची संधी दिली जावी, असा विचार यामागे होता. याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी आयसीसीनं एक समिती स्थापन केली होती. 'नाणेफेकीचा अधिकार पाहुण्या संघाला द्यायचा का, याबद्दल समितीनं चर्चा केली. मात्र सामन्याचा निकाल ठरवणाऱ्या नाणेफेकीची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय शेवटी समितीनं घेतला,' असं आयसीसीनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत माजी खेळाडू माईक गॅटिंग, मायकल हेसम, ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर आणि सामनाधिकारी डेविड बून यांचा समावेश आहे. यजमान देशानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विचार करुन खेळपट्ट्या तयार कराव्यात, अशी शिफारस या समितीनं केलीय.  

टॅग्स :नाणेफेकअनिल कुंबळेआयसीसी