भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिका कधी होईल, हा प्रश्न गेली अनेक वर्ष क्रिकेट चाहत्यांना सतावत आहे. पाकिस्तानातून दहशतवादी कृत्यांना मिळणाऱ्या खतपाणीमुळे भारत सरकारनं शेजाऱ्यांशी सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळे या राजकीय संबंधात सुधारणा होत नाही, तोपर्यंत भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिका शक्यच नाही. आता फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) स्पर्धांमध्ये उभय संघ खेळतात. आता न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांनी ICC चेअरमनपदाची सूत्रे हाती घेताना भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिकेबाबत मोठे विधान केले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) यांच्यातील संबंधाबाबत बार्कले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले,''हे प्रकरण क्रिकेट पलिकडचे आहे, परंतु या दोन देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी आयसीसीकडून सकारात्मक पाऊल उचलले जाईल, याची मी खात्री देतो. भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधापलीकडे मला अन्य गोष्टींचा विचार करायचा नाही. उभय देशांमध्ये असलेल्या सीमावादाचीही मला कल्पना आहे.''
''आयसीसी म्हणून आम्हाला जे शक्य आहे, ते आम्ही करूच आणि भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा क्रिकेट सुरू होईल, यासाठी प्रयत्न करू. त्यापलीकडे उभय देशांमधील अन्य मुद्यांवर हस्तक्षेप करण्याची पात्रता नाही. क्रिकेटचा विचार केल्यास, उभय देशांना पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणे, आम्हालाही आवडेल,''असेही बार्कले यांनी सांगितले.
हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी 2013 पासून एकमेकांविरुद्ध द्विदेशीय मालिका खेळलेले नाहीत. 2012मध्ये दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण झाल्यानंतर उभय देशांमध्ये द्विदेशीय मालिकाच झालेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धा वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया चषक आदी स्पर्धांमध्येच भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळतो.