मुंबई : सध्याच्या घडीला क्रिकेट जगतामध्ये चर्चा आहे ती महेंद्रसिंग धोनीची. कारण आता तर आयसीसीनेही धोनीची दखल घेतली आहे. फक्त दखल घेऊन आयसीसी थांबलेली नाही, तर त्यांनी धोनीचा यथोचित सन्मानही केला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-20 आणि कसोटी मालिकेत धोनी खेळला नाही. फक्त तीन एकदिवसीय सामन्यांसाठी त्याला ऑस्ट्रेलियाला बोलवण्यात आले होते. या मालिकेपूर्वी धोनी आता संपला, असे बरेच जण म्हणत होते. पण या मालिकेतील तिन्ही सामन्यांत धोनीने अर्धशतक झळकावले. दोन सामन्यांमध्ये त्याने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे धोनी नावाचा जुना फिनिशर पुन्हा एकदा भारताला मिळाला, असे म्हटले गेले. त्याचबरोबर धोनीला मालिकावीराचा पुरस्काही यावेळी देण्यात आला.
आयसीसीने धोनीच्या या नेत्रदिपक कामगिरीची दखल घेतली आहे. आपल्या ट्विटर हँडलच्या कव्हर पेजवर आयसीसीने धोनीला जागा दिली आहे. धोनीच्या चाहत्यांनाही ही गोष्ट चांगलीच रुचली आहे. त्यामुळे त्यांनीही या गोष्टीचे स्वागत केले आहे. काही जणांनी तर, धोनीवर आपले प्रेम व्यक्त केले आहे. काही जणांनी तर धोनीला कुणीही नजरअंदाज करू शकत नाही, असेही लिहिले आहे.