नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर टीका करताना या जागतिक संघटनेने गेल्या १० वर्षांत क्रिकेट संपविल्याचे म्हटले आहे. इएसपीएन क्रिकइन्फोवर संजय मांजरेकरसोबत बातचीत करताना शोएबने पांढऱ्या चेंडूंच्या क्रिकेटमधील काही नियमांवर नाराजी व्यक्त केली. मर्यादित षटकांचे क्रिकेट फलंदाजांसाठी अनुकूल बनविल्याचे शोएबने म्हटले आहे.
मांजरेकर यांनी विचारले की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांच्या चेंडूंचा वेग मंदावला असून फिरकीपटू वेगाने मारा करीत आहेत, याबाबत तुझे मत काय?
यावर शोएब म्हणाला, ‘आयसीसी क्रिकेटला संपवीत आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. आयसीसीने गेल्या १० वर्षांत क्रिकेट संपविले आहे, हे मी सार्वजनिकरीत्या सांगतो आहे. ज्याचा तुम्ही विचार केला होता ते तुम्ही केले. छान, असेही तो म्हणाला.
शोएब म्हणाला, ‘प्रति षटक बाऊंसर्सची संख्या वाढवायला हवी कारण आता दोन नवे चेंडू असून सर्कलच्या बाहेर जास्तीत जास्त चारच क्षेत्ररक्षक असतात. गेल्या १० वर्षांत क्रिकेटचा स्तर उंचावला की घसरला, हे तुम्ही आयसीसीला विचारा. आता शोएब विरुद्ध सचिन अशी लढत कुठे आहे?
सचिनबाबत बोलताना शोएब म्हणाला, ‘मी त्याच्याविरुद्ध कधीच आक्रमक होत नव्हतो. कारण जगातील या सर्वोत्तम फलंदाजासाठी माझ्या मनात आदर होता. पण, मी त्याच्या बॅटला लगाम घालण्याचा प्रयत्न करीत होतो. भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौºयादरम्यान सचिन टेनिस एल्बोमुळे संघर्ष करीत होता. मी त्याला बाऊंसर टाकले, पण त्यावेळी त्याला हूक किंवा पूलचे फटके लगावता आले नाहीत.’विराट कोहलीविरुद्ध वसीम अक्रम, वकार युनूस किंवा शेन वॉर्न यांनी गोलंदाजी केली असती तर त्याची कामगिरी कशी झाली असती याबाबत उत्सुकता असल्याचे त्याने एका उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)