Join us  

Womens ODI World:ICC ची मोठी घोषणा! भारतात रंगणार २०२५ च्या महिला विश्वचषकाचा थरार 

२०२५ मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 10:24 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी आयसीसीने एक खुशखबर दिली आहे. भारताकडे २०२५ मध्ये होणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद असणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI)मंगळवारी बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक सम्मेलनात या स्पर्धेची बोली जिंकली आहे. त्यामुळे १० वर्षांच्या अधिक कालावधीनंतर पुन्हा एकदा भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)स्पर्धेचे आयोजन होणार आहे. 

दरम्यान, भारतात शेवटच्या वेळी महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन २०१३ मध्ये करण्यात आले होते. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने वेस्टइंडिजला ११४ धावांनी पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. या फायनलच्या सामन्याचा थरार मुंबईत पार पडला होता. याशिवाय आयसीसीने आणखी तीन आयसीसी महिला स्पर्धांची घोषणा केली आहे, तसेच कोणत्या देशाकडे यजमानपद असेल हे देखील स्पष्ट केले आहे.

बांगलादेशमध्ये होणार टी-२० विश्वकपभारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बांगलादेशमध्ये २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. तर २०२६ चा टी-२० विश्वकप क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंडमध्ये पार पडेल. सध्या आर्थिक संकटात सापडलेला श्रीलंका २०२७ च्या टी-२० महिला विश्वचषकाचे यजमानपद भूषवेल. 

आयसीसीने भारताला दिलेल्या गोड बातमीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही आयसीसी महिला विश्वकप २०२५ चे आयोजन भारतातच व्हावे यासाठी इच्छुक होतो आणि आम्हाला याचा खूप आनंद आहे की भारताला यजमानपद मिळाले आहे,"असे गांगुलींनी म्हटले. 

खेळाची लोकप्रियता वाढेल - जय शाहबीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देखील आयसीसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. २०२५ च्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळाल्याचा आनंद असून बीसीसीआय ही स्पर्धा अविस्मरणीय होण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल. आपल्या देशात विश्वचषक होत असल्याने देशात खेळाची लोकप्रियता अधिक वाढेल. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघासाठी बीसीसीआय सदैव कटिबद्ध असल्याचे जय शाह यांनी सांगितले. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय महिला क्रिकेट संघआयसीसीआयसीसी आंतरखंडीय चषकबीसीसीआयजय शाहसौरभ गांगुली
Open in App