ऑस्ट्रेलियाने महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर विजय मिळवून सहावा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नावावर केला. आयसीसीने या स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची आज घोषणा केली. या संघात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व जाणवले. ऑस्ट्रेलियाचे चार खेळाडू या संघात आहेत. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या ३, इंग्लंडच्या २, वेस्ट इंडिज व भारताच्या प्रत्येकी १ खेळाडूचा समावेश आहे. १२व्या खेळाडूसाठी आयर्लंडच्या खेळाडूची निवड केली गेली आहे. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला यात संधी मिळालेली नाही.
बलाढ्य ऑस्ट्रेलियाने महिला टी-२० विश्वचषकातील आपला दबदबा दाखवून देताना सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. यासह त्यांनी विक्रमी दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक विजेतेपदाची हॅट्ट्रिकही नोंदवली. ऑस्ट्रेलियाने याआधी, २०१०, २०१२ आणि २०१४ अशी सलग तीनवेळा टी-२० विश्वविजेतेपद पटकावले होते. याच कामगिरीची पुनरावृत्ती करत त्यांनी २०१८, २०२० आणि २०२३ अशी सलग तीन टी-२० विश्वविजेतेपद उंचावले.
दक्षिण आफ्रिकेची ताझ्मिन ब्रिट्स व ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली ( यष्टिरक्षक) यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली गेली आहे. ३२ वर्षीय ब्रिट्सने ३७.२० च्या सरासरीने १८६ धावा केल्या आहेत. हिलीने ४७.२५च्या सरासरीने १८९ धावा या स्पर्धेत केल्या आणि यष्टिंमागे चार बळी टिपले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉलव्हार्ड्ट ( २३० धावा), इंग्लंडची नॅट शीव्हर-ब्रंट ( २१६ धावा), ऑस्ट्रेलियाची अॅश गार्डनर ( ११० धावा व १० विकेट्स) यांचा समावेश आहे. ब्रंटकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
भारताची एकमेव रिचा घोष ( १३६ धावा व ७ बळी) या संघात आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टन ( ११ विकेट्स), वेस्ट इंडिजची करिष्मा रामहाराक ( ५ विकेट्स), दक्षिण आफ्रिकेची शबनिम इस्मैल ( ८ विकेट्स), ऑस्ट्रेलियाची डार्सी ब्राऊन ( ७ विकेट्स) व ऑस्ट्रेलियाची मीगन शट ( १०) या गोलंदाजांचा समावेश आहे. १२वी खेळाडू म्हणून आयर्लंडच्या ऑर्ला प्रेंडर्गास्टचा समावेश आहे. हिने १०९ धावा केल्या आणि ३ विकेट्सही घेतल्या .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"