दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाद आयसीसीच्या कोर्टात गेला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिका खेळवली जात नव्हती. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीचे दार ठोठावले होते. आयसीसीने याप्रकरणी एक समिती गठित केली होती. या समितीला भारताची बाजू पटली असून त्यांनी पाकिस्तानला फटकारले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिकेसाठी करार झाला होता. पण त्यानंतर दोन्ही देशांतील संबंध चांगले राहिले नाही. 2008 साली झालेल्या हल्ल्यानंतर तर भारताने पाकिस्तानबरोबर न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
पाकिस्तानने भारताला मालिकेबाबत विचारणा केली होती. त्यावेळी बीसीसीआयने त्यांना सांगितले होते की, " जोपर्यंत केंद्र सरकार आम्हाला परवानगी देत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर द्विपक्षीय मालिका खेळू शकत नाही."
बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने त्यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. बीसीसीआयने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर पाकिस्तानने आम्ही आयसीसीकडे दाद मागायला जाण्याचा तयारीत आहोत, अशी धमकी वजा माहिती बीसीसीआयला दिली होती. बीसीसीआयने यावेळी कोणतीही प्रतिक्रीया न दिल्याने पीसीबी आयसीसीकडे दाद मागितली होती.
आयसीसीने याप्रकरणी एक समिती गठन केली होती. या समितीने पीसीबी आणि बीसीसीआयचे म्हणणे ऐकून घेतले. याप्रकरणी तीन दिवस सुनावणी करण्यात आली आणि भारत पाकिस्तानला नुकसान भरपाई देणार नाही, असा निर्णय घेतला.