पाकिस्तानचा संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेचा सामना करणार आहे. त्यानंतर ९ जूनला भारताशी त्यांना भिडायचे आहे. पण, या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC) हॉटेल बदलण्याची मागणी केली. पीसीबीच्या तक्रारीला प्रतिसाद देत आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघाला त्यांच्या आगामी लढतीपूर्वी न्यूयॉर्कमधील सामन्याच्या ठिकाणाजवळील हॉटेलमध्ये स्थलांतरित केले आहे.
पीसीबीने संघाच्या सुरुवातीच्या हॉटेलबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर हे पाऊल उचलले गेले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाची राहण्याची सोय करण्यात आलेले आधीचे हॉटेल स्टेडियमपासून ९० मिनिटांच्या अंतरावर होते. अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वाखालील पीसीबीने हे हॉटेल स्टेडियमपासून लांब असून संघाला खूप प्रवास करावा लागत असल्याची औपचारिक तक्रार दाखल केली.
नक्वी यांच्या हस्तक्षेपानंतर, आयसीसीने संघाला वेस्टबरी, न्यूयॉर्क येथील लाँग आयलँडवरील स्टेडियमपासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली. नवीन निवासस्थानामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आणि त्यांना सामन्यासाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. पाकिस्तानला रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारताशी सामना करायचा आहे, त्यानंतर ११ जून रोजी त्याच ठिकाणी कॅनडाविरुद्धचा सामना होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ न्यू यॉर्कमध्ये स्टेडियमपासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघर्ष करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने त्यांना हॉटेलपासून एक तासापेक्षा जास्त अंतरावर असलेल्या स्टेडियमपर्यंतच्या लांब प्रवासाबद्दल अशीच चिंता व्यक्त केली होती. पाकिस्तानचा संघ गुरुवारी डॅलस येथे सह-यजमान युनायटेड स्टेट्स विरुद्ध अ गटातील सलामीच्या सामन्यानंतर न्यूयॉर्कला रवाना होईल.