दुबई: ऑक्टोबरमध्ये भारताच्या यजमानपदाखाली आयोजित एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले; पण पाकिस्तान संघ भारतात येण्यावर संभ्रमावस्थेत आहे. काही प्रश्न उपस्थित करणाऱ्या पीसीबीला आयसीसीने सहभाग निश्चितीसाठी करार झाला असल्याची आठवण करून देत कराराचेे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करू, असा इशाराही दिला.
पीसीबीने एक दिवसाआधी केलेल्या निवेदनात म्हटले की, ‘आम्हाला पाकिस्तान सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालेले नाही. त्यामुळे विश्वचषकासाठी भारतात जाण्याबाबत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.’ यावर आयसीसीने म्हटले की, ‘पीसीबीने या करारावर स्वाक्षरी केली असून ते भारतात खेळण्यास बांधील आहेत असे आम्ही मानतो.’ विश्वचषकात सहभागी होण्याबाबत जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीसीबी निर्णय घेऊ शकते.
आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जॉर्ज बार्कले म्हणाले, ‘तुम्ही कराराचे उल्लंघन केल्यास योग्य ती पावले उचलली जातील. सहभागी होण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. आम्हाला आशा आहे की, करार मोडीत निघणार नाही आणि पाक संघ भारतात येईल. विश्वचषकात सहभागी होणारे सर्व संघ आपापल्या देशाच्या नियमांना बांधील आहेत आणि आम्ही त्याचा आदर करतो. मात्र, विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तान नक्कीच भारतात येईल, असा आम्हाला विश्वास आहे.’