Join us  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम संघाचा रोहित 'बॉस'! प्लेइंग XI मध्ये ६ भारतीय; अफगाणिस्तानचे ३

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील सर्वोत्तम संघ आयसीसीने जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 11:56 AM

Open in App

ICC Team of the Tournament of World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील सर्वोत्तम संघ आयसीसीने जाहीर केला आहे. या संघात भारतीय संघातील सहा शिलेदारांचा समावेश आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. तब्बल १३ वर्षांनंतर भारताला आयसीसीचा किताब जिंकता आला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत अखेरच्या षटकात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह यांची घातक गोलंदाजी... याशिवाय सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला अप्रतिम झेल यामुळे सामन्याचा निकाल बदलला. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यंदाच्या विश्वचषकातील सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे.  आयसीसीच्या सर्वोत्तम संघात भारतीय कर्णधार रोहित शर्मा, अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज, वेस्ट इंडिजचा स्फोटक खेळाडू निकोलस पूरन, भारताचा मिस्टर ३६० सूर्यकुमार यादव, ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस, अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि फझलहक फारूकी यांना संधी मिळाली आहे. तर बारावा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नॉर्तजेने जागा मिळवली. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम संघ -रोहित शर्मा, रहमानुल्लाह गुरबाज, निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव, मार्कस स्टॉयनिस, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, राशिद खान, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, अझलहक फारूकी. 

दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचं दुःख अखेर त्याच्या मनातून दूर झाले असावे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला. भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आयसीसीरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ