ठळक मुद्देपाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदची वर्णद्वेषी टिप्पणीदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यातील प्रसंगआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतली गंभीर दखल
डर्बन, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमदला दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर केलेली टिप्पणी महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात सर्फराजने आफ्रिकेच्या अँडिले फेलुक्वायोला 'काळ्या' असे संबोधले होते. त्याच्या या टिप्पणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. टीका झाल्यानंतर सर्फराजने माफी मागितली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सर्फराजवर 4 वन डे किंवा 2 कसोटी सामन्यांच्या बंदीची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचे तीन फलंदाज 29 धावांवर माघारी परतले होते. युवा गोलंदाज शाहीन आफ्रीदीच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. पण, 5 बाद 80 अशा धावांवरून डुसेर आणि फेलुक्वायो यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या 37 व्या षटकात सर्फराजने केलेली वर्णद्वेषी टिप्पणी स्टम्प्समधील माइकमध्ये रेकॉर्ड झाली आणि वादाचा भडका उडाला. आफ्रिकेने दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट आणि 8 षटकं राखून विजय मिळवला. व्हॅन डेर डुसेर ( 80*) आणि अँडिले फेलुक्वायो ( 69*) यांच्या कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेने हा सामना जिंकला आणि मालिका 1-1 ने बरोबरीत आणली.
सर्फराज ऊर्दूत म्हणाला," अबे काले तेरी अम्मी आज कहाँ बैठी है? क्या पर्वाके आया है आज? ( तुझ्या आईने आज कोठे प्रार्थना केली की तू चांगली कामगिरी करत आहेस?)" सर्फराजचे हे वाक्य कॉमेंटेटर्सना कळले नाही आणि त्यांनी रमीझ राजाला अर्थ विचारला. त्यावर याचे भाषांतर करणे अवघड असल्याची सावध भूमिका रमीझ राजाने घेतली.
दक्षिण आफ्रिका संघाच्या व्यवस्थापकाने मोहम्मद मूसाजी यांनी सांगितले की,'' या प्रकरणाची दखल आयसीसी आणि मॅच अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. तपासाचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्यावर प्रतिक्रीया देऊ.''
Web Title: ICC investigating racism charges against Sarfraz Ahmed, could hand 4 ODI or 2 Test ban to Pakistan skipper
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.