आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंदर्भात क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेसंदर्भात आता एक मोठी माहिती समोर येत आहे. पुढच्या आठवड्यातच आयसीसी मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या कार्यक्रमाची घोषणा करू शकते. १० ते १२ नोव्हेंबर या दरम्यान आयसीसीची एक टीम लाहोरला भेट देणार आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भातील व्यवस्थेची पाहणी ही टीम करेल. एवढेच नाही तर या भेटीदरम्यान एक कार्यक्रम निजोजित आहे. याचवेळी स्पर्धेच्या वेळापत्रकासंदर्भातील सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कधी समोर येणार वेळापत्रक?
पाकिस्तानमधील माध्यमांतील वृत्तानुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक सदस्य देशांसोबत आधीच शेअर केले गेले आहे. ११ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात क्रिकेटपटूंसह प्रमुख व्यक्तींच्या उपस्थित आगामी स्पर्धेसंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृतरित्या जाहिर करण्यात येईल.
भारत-पाक एकाच गटात; पण...
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, यजमान पाकिस्तान संघासह भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ 'अ' गटात ठेवण्यात आले आहेत. 'ब' गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश असेल. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? या प्रश्न अजूनही सुटलेला नाही. भारत सरकारने मंजुरी दिली तरच बीसीसीआय पुढची पावले उचलेल.
असे असेल भारतीय संघाचे साखळी फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक
जे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे त्यानुसार, भारतीय संघाचे सर्व सामने लाहोरमध्ये नियोजित आहेत. २० फेब्रुवारीला भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या लढतीतून या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर २३ फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि त्यानंतर १ मार्च रोजी भारत पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना पाहायला मिळेल. प्रस्तावित वेळापत्रकानुसार, सर्व होणार की, यात काही बदल होणार ते लकरच कळेल.
फायनल कधी?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत खेळवली जाणार आहे. १० मार्च हा राखीव दिवस असेल. लाहोर, कराची आणि रावळपिंडीच्या मैदानात या स्पर्धेतील सामने नियोजित आहेत. फायनल सामना ९ मार्चला लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहे.