ICC Test Rankings सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराहनं क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज असा ठसा उमटवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नव्याने जाहीर केलेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत त्याने आपलं अव्वलस्थान कायम राखले आहे. पण यावेळी त्याने रेटिंग पॉइंट्सच्या खास पराक्रम करून दाखवन नवा विक्रम सेट केला आहे. ही गोष्ट त्याच्या रँकिंगमधील टॉप क्लास शोला आणखी खास ठरवते.
सर्वोच्च रेटिंग पॉइंट्ससह सेट केला नवा विक्रम
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं दमदार गोलंदाजी केली होती. या कामगिरीच्या जोरावर अव्वलस्थान कायम राखण्यासोबतच त्याने रेटिंग पॉइंट्सच्या जोरावर खास विक्रमाला गवसणी घातलीये. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतीय जलदगती गोलंदाजाने ९ विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीसह आयसीसी क्रमवारीत त्याच्या खात्यात ९०४ रेटिंग पॉइंट्सची नोंद झालीये. भारतीय जलदगती गोलंदाजाने आयसीसी कसोटी क्रमावारीत नोंदवलेली ही सर्वोच कामगिरी आहे. एवढेच नाही तर यासह त्याने आर अश्विनच्या विक्रमाचीही बरोबरी केलीये.
आर. अश्विनच्या विक्रमाशी केली बरोबरी
कसोटी क्रमवारीत आर. अश्विन याने नोंदवलेल्या सर्वोच्च रेटिंग पॉइंट्सच्या विक्रमाशीही बुमराहनं बरोबरी साधलीये. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या रविचंद्रन अश्विन याने २०१६ मध्ये आपल्या कारकिर्दीत कसोटी क्रमवारीत ९०४ रेटिंग पॉइंट्ससह सर्वोच्च कामगिरीची नोंद केली होती. कोणत्याही भारतीय गोलंदाजाची क्रमावरीतील ही सर्वोच्च कामगिरी होती. आता जसप्रीत बुमराहनं या विक्रमाशीही बरोबरी केलीये. तो देखील ९०४ रेटिंग पॉइंट्ससवर पोहचला असून मेलबर्न कसोटी सामन्यातील कामगिरीच्या जोरावर बुमराह आणखी पुढे झेप मारू शकतो.
बुमराहपाठोपाठ लागतो रबाडा अन् हेजलवूडचा नंबर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत २१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर जसप्रीत बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडाला मागे सोडले होते. दोघांच्यामध्ये आता ४८ रेटिंग पॉइंट्सचा फरक आहे. कगिसो रबाडा ८५६ रेटिंग पॉइंट्ससह गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून त्याच्यापाठोपाठ या यादीत जोश हेजलवूडचा नंबर लागतो. हेजलवूडच्या खात्यात ८५२ रेटिंग पॉइंट्सची नोंद आहे.