आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) क्रिकेटमधील चुरस आणखी वाढवण्यासाठी नवीन नियम आणत आहेत. नो बॉलवर नजर ठेवण्यासाठी तिसऱ्या अंपायरची मदत, जखमी खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला खेळण्याची संधी... आदी अनेक नवीन नियम सध्या पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी एका नियमाची भर पडली आहे आणि तो वर्ल्ड कप स्पर्धेशी संबंधित आहे. त्यामुळे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या सारख्या बलाढ्य संघांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयसीसीच्या स्पर्धांसाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आदी संघ मोठ्या संख्येनं सदस्य पाठवतात. त्यांच्या या सदस्य संख्येवर आता चाप बसणार आहे. Mumbai Mirror नं दिलेल्य वृत्तानुसार सदस्य संख्या कमी करण्याचा विचार आयसीसी करत आहे. आयसीसीच्या स्पर्धांसाठी सध्या 25 जणांचा चमूला परवानगी आहे. ती कमी करून 23वर आणण्याची आयसीसीआयची तयारी आहे. यापूर्वी आयसीसीच्या एका स्पर्धेसाठी इंग्लंडनं 28 सदस्यीय संघ पाठवला होता.
भारतीय संघ 28 सदस्यांसह सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यात 15 खेळाडू, चार प्रशिक्षक, दोन नेट्समध्ये सरावाकरीता स्पेशालिस्ट, एक ट्रेनर, एक फिजीओ, दोन मसाजर, एक व्यवस्थापक, एक मीडिया मॅनेजर आणि एक लॉजिस्टीक मॅनेजर यांचा समावेश आहे. या नियमांची अंमलबजावणी दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत करण्यात आली आहे आणि आगामी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतही होणार आहे.
याशिवाय या नव्या नियमानुसार अतिरिक्त सदस्य संघासोबत असू शकणार नाही. त्या अतिरिक्त सदस्याचा खर्च जरी क्रिकेट मंडळ करणार असले, तरी आयसीसीनं त्याच्यावरही बंदी घातली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला मोठा ताफा घेऊन जाता येणार नाही. 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं 16वा खेळाडू म्हणून धवन कुलकर्णीला नेले होते. गतवर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत रिषभ पंत हा काही काळ अनऑफिशियल सदस्य होता. शिखर धवनच्या दुखापतीनंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला.
यजमान देशावर संघांच्या राहण्या-खाण्याचा खर्चाचा भार पडत असल्यानं आयसीसीनं हा नवा नियम आणला आहे. अतिरिक्त सदस्यांसोबत दौऱ्यावर जाणाऱ्या संघांची अडचण होणार आहे.
Web Title: ICC limits World Cup squads to 23 members; unofficial players not allowed any more
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.