नवी दिल्ली : आगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगते. दोन्ही देशातील माजी खेळाडू या बहुचर्चित सामन्यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
अशातच पाकिस्तानी संघाचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदीने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भारतात होणारा विश्वचषक आणि भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल भाष्य केले आहे. "केवळ भारताविरूद्धच्या सामन्याबद्दल विचार करणे थांबवायला हवे. तसेच विश्वचषक कसा जिंकता येईल यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण भारताविरूद्ध केवळ एक सामना असेल. पण एक संघ म्हणून विश्वचषक कसा जिंकायचा हे आमचे लक्ष्य असले पाहिजे", असे शाहीनने सांगितले.
खरं तर पाकिस्तानी संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ते २० जुलै यादरम्यान खेळवला जाईल, तर दुसरा सामना २४ ते २८ जुलैदरम्यान होईल. गॉले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिल्या सामन्याचा थरार रंगेल. तर दुसरा सामना कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडेल.
भारतात रंगणार थरार दरम्यान, १० वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना २०१९च्या विश्वचषकातील फायनलिस्ट न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू