नवी दिल्ली : वन डे विश्वचषक २०२३ चा थरार भारतात रंगणार आहे. मंगळवारी या बहुचर्चित स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले. मागील काही महिन्यांपासून भारतात खेळायला नकार देणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नमते घ्यावे लागले. कारण पाकिस्तानी संघ नियोजित वेळापत्रकानुसार विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार आहे. यावरूनच आता पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज वसिम अक्रमने पीसीबीला टोमणा मारला आहे.
"पाकिस्तानचा सामना कुठेही झाला तरी ते तिथे खेळतील यात शंका नाही. पाकिस्तानी याची फार चिंता करत नाहीत. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय संघ पाकिस्तानात न आल्यास आमचा संघ भारतात पाठवणार नसल्याचे म्हटले होते. ते अनेकदा हे नाही करणार ते नाही करणार अशी विधाने करत असतात. पण मी म्हणतो, तुमचे नियोजन नसेल तर हे बोलूच नये. BCCI ला आव्हान देण्याची क्षमता नाही, मग पोकळ धमक्या का देता?", अशा शब्दांत अक्रमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फटकारले.
आगामी वन डे विश्वचषक भारतात होत असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू
विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -
- ६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर १, हैदराबाद
- १२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालियर २, हैदराबाद
- १५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
- २० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
- २३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान, चेन्नई
- २७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई
- ३१ ऑक्टोबर- पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
- ४ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
- १२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता