नवी दिल्ली : आगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.
२०२३ च्या विश्वचषकातील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याबाबत बोलताना वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल म्हणाला की, जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने असतात. तेव्हा त्यांच्या या सामन्यावर खूप खर्चही होत असतो. त्यामुळे पाकिस्तान आणि भारताच्या खेळाडूंनी या सामन्यासाठी भरपूर पैशांची मागणी केली पाहिजे, असे गेलने मजेशीरपणे म्हटले. तसेच भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे चार संघ आगामी विश्वचषकात उपांत्य फेरी गाठतील असा दावा गेलने केला आहे. भारतात रंगणार थरार दरम्यान, १० वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना २०१९च्या विश्वचषकातील फायनलिस्ट न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू