ICC Men's ODI Team of the Year : २०२१ वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघापाठोपाठ आयसीसीनं गुरुवारी वन डे संघाचीही घोषणा केली. २०२१मधील वन डे क्रिकेटमधील खेळाडूंच्या कामगिरीवरून आयसीसीनं ११ जणांचा हा सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्याकडे आयसीसीनं ट्वेंटी-२०पाठोपाठ वन डे संघाचेही नेतृत्व सोपवले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याही संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. आयर्लंड, बांगलादेश, श्रीलंका आदी देशांच्या खेळाडूंचे वर्चस्व या संघात दिसत आहे.
- पॉल स्टीर्लिंग ( आयर्लंड ) - २०२१ या वर्षात वन डे क्रिकेटमध्ये आयर्लंडच्या पॉल स्टीर्लिंगनं सर्वाधिक ७०५ धावा केल्या आहेत. त्यानं १४ सामन्यांत ७९.६६च्या सरासरीनं या धावा करताना तीन शतकं व दोन अर्धशतकं झळकावली आहेत.
- जान्नेमन मलान ( दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेच्या युवा फलंदाजानं आयसीसीच्या वन डे संघात स्थान पटकावले आहे. त्यानं मागील वर्षी ८४.८३च्या सरासरीनं ५०९ धावा केल्या आणि त्यात दोन शतकं व दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
- बाबर आजम - कर्णधार ( पाकिस्तान) - पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमनं मागील वर्षी अनेक विक्रम केले. त्यानं ६ सामन्यांत ६७.५०च्या सरासरीनं ४०५ धावा केल्या. त्यानं दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथे दमदार कामगिरी केली आणि दोन्ही मालिकांमध्ये प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला .
- फाखर जमान ( पाकिस्तान) - पाकिस्तानच्या या खेळाडूनं ६०.३८च्या सरासरीनं ३६५ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे. जोहान्सबर्ग वन डे सामन्यांत ३४२ धावांचा पाठलाग करताना जमाननं १९३ धावांची दमदार खेळी केली होती.
- रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन ( दक्षिण आफ्रिका) - आफ्रिकेच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज व्हॅन डेर ड्यूसेन यानं कालच भारताविरुद्ध शतकी खेळी करून त्याचा क्लास दाखवला. त्यानं मागच्या वर्षी ८ सामन्यांत ५७च्या सरासरीनं ३४२ धावा केल्या.
- शाकिब अल हसन ( बांगलादेश ) - बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडूनं पुन्हा एकदा आयसीसीच्या संघात स्थान पटकावले आहे. त्यानं २०२१मध्ये ३९.५८च्या सरासरीनं २७७ धावा केल्या आणि १७ विकेट्सही घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत त्यानं सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
- मुश्फीकर रहिम - यष्टिरक्षक ( बांगलादेश) - मुश्फीकर रहिमनं ९ सामन्यांत ५८.१४च्या सरासरीनं ४०७ धावा केल्या आहेत. त्यात एका शतकाचाही समावेश आहे.
- वनिंदू हसरंगा ( श्रीलंका) - अष्टपैलू खेळाडू वनिंदूनं १४ सामन्यांत ३५६ धावा करताना १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या खेळीत तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
- मुस्ताफिजूर रहमान ( बांगलादेश) - २०२१मध्ये मुस्ताफिजूरनं १० सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या आहे. त्यानं ५.०३च्या इकॉनॉमीनं गोलंदाजी केली आहे.
- सिमि सिंग ( आयर्लंड ) - आयर्लंडच्या फिरकीपटूनं १३ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं फलंदाजीतही योगदान देताना एक शतक व एक अर्धशतकासह ४६.६६च्या सरासरीनं २८० धावाही केल्या आहेत.
- दुष्मंथा चमीरा ( श्रीलंका) - यानं १४ सामन्यांत २० विकेट्स घेतल्या आहेत.