ICC Men's Player Of The Month Award : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय गोलंदाजीचा मोर्चा सांभाळणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम कामगिरीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दाद दिली. बुमराहने अनेकदा मोक्याच्या क्षणी कमी धावा देत महत्त्वाचे बळी घेतले. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांना बाद करून शेजाऱ्यांच्या तोंडचा घास पळवला होता. याचेच बक्षीस आयसीसीने दिले आहे. खरे तर जसप्रीत बुमराहला जून महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला आहे.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथच्या शर्यतीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाज होता. अखेर ३० वर्षीय बुमराहने बाजी मारून हा पुरस्कार पटकावला. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर झालेल्या विश्वचषकात बुमराहने एकूण १५ बळी घेतले. विशेष बाब म्हणजे त्याने अवघ्या ४.१७ च्या सरासरीने गोलंदाजी करून क्रिकेट विश्वाला आपलेसे केले.
प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळताच बुमराहने कर्णधार रोहितचे आभार मानले. तो म्हणाला की, आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मला मिळाल्याने खूप आनंद झाला. मागील काही दिवस अमेरिका आणि वेस्ट इंडिजमघ्ये घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. पण, आम्ही एक संघ म्हणून याचा आनंद साजरा करू. विश्वचषकासारख्या स्पर्धेत चांगली कामगिरी करणे आणि ट्रॉफी जिंकणे हे खूप खास होते. या आठवणी मी आयुष्यभर सोबत ठेवेन. मी रोहित शर्मा आणि रहमानुल्लाह गुरबाज यांचे अभिनंदन करू इच्छितो. ते या पुरस्कारासाठी स्पर्धेत होते पण माझी निवड करण्यात आली. याशिवाय मी माझे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि संघातील सहकाऱ्यांचा आभारी आहे.
Web Title: ICC Men’s Player of the Month winner for June in team india's star bowler Jasprit Bumrah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.