Join us  

ICC Rankings : Suryakumar Yadav नंबर वन! मोहम्मद रिझवानला धक्का देत गौतम गंभीर, विराट कोहलीच्या पंक्तित स्थान

ICC Men's Player Rankings : भारताच्या ट्वेंटी-२० संघात सूर्यकुमार यादवची सध्या चलती आहे. Suryakumar Yadavच्या स्फोटक खेळीने प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी भरवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 5:01 PM

Open in App

ICC Men's Player Rankings : भारताच्या ट्वेंटी-२० संघात सूर्यकुमार यादवची सध्या चलती आहे. Suryakumar Yadavच्या स्फोटक खेळीने प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी भरवली आहे. कर्णधार रोहित शर्माही सूर्यावर खूप आनंदी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजचा मान पटकावला. त्याने दुसऱ्या सामन्यात वादळी खेळी करून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वात कमी चेंडूंत १०००+ धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. त्याचा हा खेळ असाच कायम राहावा यासाठी कर्णधार रोहित शर्मानेही ( Rohit Sharma) त्याला थेट २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानावर उतवरण्याचा निर्णय घेतला. २ ऑक्टोबरच्या सामन्यात त्याने २२ चेंडूंत ६१ धावांची वादळी खेळी केली होती आणि त्याच्या जोरावर त्याने आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले होते.

आयसीसीने बुधवारी ट्वेंटी-२० क्रमवारी जाहीर केली. सूर्यकुमारने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक ११९ धावा केल्या आणि आता त्याने ट्वेंटी-२० फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर कब्जा करण्यासाठी आगेकूच केली आहे. सध्या पाकिस्तानचा रिझवान टॉप बॅट्समन आहे. सूर्याने २०२२ हे वर्ष गाजवले आणि त्याने भारताकडून सर्वाधिक धावाही केल्या आहेत. २ ऑक्टोबरलाच सूर्याने रिझवानसह अव्वल क्रमांक पटकावला होता. गौतम गंभीर व विराट कोहली यांच्यानंतर ट्वेंटी-२० फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावणारा सूर्या तिसरा भारतीय फलंदाज ठरला. पण, कालच्या सामन्यात तो अवघ्या ८ धावांवर बाद झाला आणि दुसऱ्या क्रमांकावर घसरला. आता ३२ वर्षीय सूर्या व रिझवान यांच्यात फक्त १६ रेटींग गुणांचे अंतर राहिले आहे आणि आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्या अव्वल स्थान पटकावेल, अशी चाहत्यांना आशा आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या ७ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत रिझवानने ३१६ धावा केल्या. त्याला सहाव्या सामन्यात विश्रांती दिली गेली होती. रिझवानच्या खात्यात ८५४ रेटींग गुण आहेत, तर सूर्याचे ८३८ रेटींग गुण आहेत. त्यामुळे २३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) या सामन्यात सूर्या वि. रिझवान असाही सामना पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( ८०१) तिसऱ्या स्थानावर कायम आहे. भारताच्या लोकेश राहुलने ७ स्थानांच्या सुधारणेसह १४वा क्रमांक पटकावला आहे. आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांत त्याने १०८ धावा केल्या आहेत. आफ्रिकेचे क्विंटन डी कॉक १२व्या , रिली रोसोवू २०व्या आणि डेव्हिड मिलर २९व्या क्रमांकावर झेपावले आहेत.  

इंग्लंडचा डेवीड मलान पाचव्या स्थानी सरकला आहे. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने अव्वल स्थान टिकवले आहे. भारताचा एकही गोलंदाज टॉप टेनमध्ये नाही. अष्टपैलूंमध्ये तब्रेझ शम्सी व आदिल राशिद यांना टॉप १० मधून बाहेर जावे लागले. हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर कायम आहे.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवआयसीसीपाकिस्तान
Open in App