ICC Men’s T20 World Cup 2024 - भारतीय संघाने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तगड्या १५ खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १ जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. भारताला २००७ नंतर एकदाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावता आलेला नाही आणि २०१३ नंतर सुरू असलेल्या आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. २००७च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील स्टार खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्याने आगामी स्पर्धेसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत मत व्यक्त केले आहे.
तो म्हणाला, माझ्या मते रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी सलामीला यायला हवे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फिट आहे आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर व पुढे अनेक मोठी नावं आहेतच. या संघात मला लेफ्ट हँड व राईट हँट कॉम्बिनेशन अधिक पाहायला आवडेल, कारण त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना गोलंदाजी करणे अवघड जाईल.
यष्टिरक्षकाच्या शर्यतीत संजू सॅमसन व रिषभ पंत यांच्यात चढाओढ आहे. या दोघांनी आयपीएल २०२४ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. संजूने कर्णधारपदाची जबाबदारीही सक्षमपणे पार पाडली आहे, परंतु तो RR साठी वरच्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्याने १४ सामन्यांत ५०४ धावा केल्या आहेत आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो सातव्या क्रमांकावर आहे. तेच दुसरीकडे १४ महिन्यानंतर मैदानावर परतलेल्या रिषभने १३ सामन्यांत ४४६ धावा केल्या आहेत. पण, युवराज म्हणतोय, मी रिषभ पंतची निवड करीन. संजू हा चांगल्या फॉर्मात आहे, परंतु रिषभ हा डावखुरा फलंदाज आहे आणि भारताला सामना जिंकून देण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने यापूर्वीही हे केलं आहे.
हार्दिक पांड्या या संघाचा उप कर्णधार आहे, परंतु त्याला आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. तरीही युवी त्याच्या मागे उभा आहे. त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड व्हायला हवी, असे युवी म्हणाला. पण, त्याने त्याच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली. याचवेळी त्याने शिवम दुबेची संघात निवड केली आहे. दुबेने आयपीएलमध्ये १४ सामन्यांत ३९६ धावा केल्या आहेत. युझवेंद्र चहल याचीही प्लेइंग इलेव्हनमध्ये युवीने निवड केली आहे. चहलने ११ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज हे दोन जलदगती गोलंदाज युवीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत.
मिशन वर्ल्ड कप...
रोहित शर्माने आता सर्व लक्ष २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेकडे वळवले आहे. भारतीय संघ १ जूनला बांगलादेशविरुद्ध एकमेव सराव सामाना खेळेल. भारताला अ गटात अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंडचा सामना करायचा आहे. भारतीय संघ सुरुवातीला आयपीएल लीग स्टेजच्या समाप्तीनंतर लगेचच २१ मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होणार होता. पण, आता संघ २५ व २६ मे रोजी दोन बॅचमध्ये रवाना होणार आहे. न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने ५ जून (वि. आयर्लंड), ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) रोजी होणार आहेत. कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद