आयसीसी टी-२० वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामन्यात कमालीच्या विक्रमाची नोंद झाली. शनिवारी (३१ ऑगस्ट २०२४) रोजी मंगोलिया आणि हाँगकाँग यांच्यातील सामना बायुएमास ओव्हल क्रिकेट मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात हाँगकाँगच्या संघाने १० चेंडूत सामना खिशात घातला. यासह हाँगकाँग संघाच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांच्या यादीत ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
अवघ्या १७ धावांवर खेळ खल्लास!
बायुएमास ओव्हल क्रिकेट मैदानात रंगलेल्या सामन्यात टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या मंगोलियाचा संघ १४.२ षटकात अवघ्या १७ धावांत आटोपला. संघातील एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ५ ही संघातील खेळाडूने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती. मोहन विवेकानंदन याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १८ चेंडूचा सामना करताना ५ धावा काढल्या.
आयुष शुक्लाची कमाल, आपल्या कोट्यातील चारही षटके निर्धाव
या सामन्यात हाँगकाँगच्या संघातील आयुष शुक्ला याने कमालीची गोलंदाजी केली. त्याने आपल्या कोट्यातील सर्वच्या सर्व ४ षटके निर्धाव टाकण्याचा पराक्रम करून दाखवला. एकही धाव न देणाऱ्या या गोलंदाजाने एक विकेटही आपल्या खात्यात जमा केली. शुक्लाने प्रतिस्पर्धी संघातील सलामीचा बॅटरला शून्यावर बाद केले.
१० चेंडूत जिंकला सामना, जलद धावांचा पाठलाग करण्यात हाँगकाँग तिसऱ्या स्थानी; अव्वल कोण?
मंगोलियाने दिलेल्या अवघ्या १८ धावांचे टार्गेट हाँगकाँगच्या संघाने अवघ्या १० चेंडूत पूर्ण केले. यात त्यांनी एक विकेटही गावली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांच्या बाबतीत हाँगकाँगचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. हा एक खास रेकॉर्डच आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर स्पेनचा नंबर लागतो. २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी स्पेनच्या संघाने आईल ऑफ मान या संघाविरुद्ध ११८ चेंडू आणि १० विकेट राखून विजय नोंदवला होता. ९ मे २०२४ रोजी जपानने मंगोलियाला ११२ चेंडू आणि १० विकेट्स राखून पराभूत केले होते.
Web Title: ICC Mens T20 World Cup Asia Qualifier A 2024 Hong Kong Set Record 3rd Fastest Chase In T20I Against Mongolia History
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.