सध्या भारतात इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे वारे वाहत आहेत... रिंकू सिंग, तिलक वर्मा आदी युवा खेळाडू आपलं टॅलेंट दाखवत आहेत . तेच दुसरीकडे सूर्यकुमार यादवसारखा ( Suryakumar Yadav) ट्वेंटी-२०तील नंबर वन फलंदाज 'गोल्डन डक'च्या मागे लागला आहे. मुंबई इंडियन्सचा हा सुपरस्टार कालही दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मागील सहा ट्वेंटी-२० इनिंग्जमध्ये सूर्या चारवेळा गोल्डन डकवर बाद झालाय आणि दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे १५ व १ धाव काढलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आयपीएलआधी गोल्डन डकची हॅटट्रिक साजरी केली. आता त्याचा फटका त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बसण्याची शक्यता आहे.
आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत सूर्यकुमार यादव फलंदाजांमध्ये नंबर १ आहे. पण, त्याच्या या स्थानाला पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि बाबर आजम यांच्याकडून धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानचा संघ शनिवारपासून न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी बाबरने फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत बाबर व रिझवान यांना विश्रांती दिली होती, परंतु ते आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत परतणार आहेत.
सूर्यकुमार ९०६ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ८११ रेटिंग गुणांसह रिझवान दुसऱ्या आणि ७५५ गुणांसह बाबर तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे पाकिस्तान दौऱ्यावर नसल्याने बाबरला एक स्थान वर सरकण्याची संधी मिळाली. कॉनवे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. सूर्या वगळल्यास ट्वेंटी-२० फलंदाजांच्या टॉप १० मध्ये एकही भारतीय नाही, गोलंदाजांमध्येही हिच परिस्थिती आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याने दुसरे स्थान टिकवले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"