ICC Men's Test Player Rankings : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ असी मुसंडी मारली आहे आणि या कामगिरीचा खेळाडूंना आयसीसी कसोटी क्रमवारीत फायदा झालेला पाहायला मिळतोय. युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) राजकोट कसोटीत कारकीर्दितील दुसरे द्विशतक साजरे केले आणि आयसीसी क्रमवारीत त्याने १४ स्थानांची झेप घेत थेट १५वे स्थान पटकावले. कसोटी कारकीर्दितील यशस्वीची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे.
भारताचे चार खेळाडू आता फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल १५ मध्ये आहेत. यामध्ये विराट कोली ( सातवा), रोहित शर्मा ( १२) आणि रिषभ पंत ( १४) यांचा समावेश आहे. न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विलियम्सन अव्वल स्थान टिकवून आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विलियम्सनने मॅच विनिंग शतक झळकावले होते. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट १२ क्रमांकाच्या सुधारणेसह १३व्या स्थानी आला आहे. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा या क्रमवारीत ७ स्थान वर सरकून ३४व्या क्रमांकावर आला आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड बेडिंगहॅम ( २९ स्थान वर) ५०व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन ( २) हा अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या जसप्रीत बुमराहच्या जवळ पोहोचला आहे. राजकोट कसोटीत त्याने ५०० विकेट्सचा टप्पा ओलांडला. अष्टपैलू रवींद्र जडेजाने राजकोट कसोटीत ५ विकेट्स घेतल्या आणि तो गोलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानी आला आहे. जडेजाने त्या कसोटीत शतक व एकूण ७ विकेट्स घेतल्या होत्या आणि तो अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.