ICC Men's Test Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) याने अॅशेस मालिकेत दमदार खेळ केला आहे आणि त्या जोरावर तो चार स्थान वर सरकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत स्मिथने ३२ वे शतक झळकावले. त्याचा फायदा आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत झाला. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडचा स्टार केन विलियम्सन हा ४ महिने कसोटी खेळलेला नाही, परंतु तो नंबर वन बनला आहे. केन ( ८८३) आणि स्टीव्ह स्मिथ ( ८८२) यांच्यात केवळ एका रेटिंग पॉइंटचा फरक आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करून स्मिथला नंबर वन बनण्याची संधी आहे.
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट नंबर वन स्थानी होता, परंतु त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १० व १८ धावाच करता आल्या आणि त्यामुळे तो थेट पाचव्या स्थानावर पोहोचला. ऑगस्ट २०२१ नंतर स्मिथ पहिल्यांदा नंबर वन क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी तो नोव्हेंबर २०१५ मध्ये अव्वल स्थानी आला होता. फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल ७ मध्ये ऑस्ट्रेलियाचे ४ खेळाडू आहेत. मार्नस लाबुशेन तिसऱ्या, ट्रॅव्हिस हेड चौथ्या आणि उस्मान ख्वाजा सातव्या स्थानावर आहेत. बाबर आजमही एक स्थान खाली सरकला असून तो सहाव्या क्रमांकावर गेला. भारताचा रिषभ पंत दहाव्या, रोहित शर्मा बाराव्या आणि विराट कोहली चौदाव्या क्रमांकावर आहेत.
कसोटी गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स ( ८२६) नंबर वन आर अश्विनला ( ८६०) टक्कर देण्यासाठी दोन स्थान वर सरकला आहे. कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कागिसो रबाडा ( ८२५) व जेम्स अँडरसन ( ८१३) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. अश्विन वगळता टॉप टेन गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह ( ८) आणि रवींद्र जडेजा ( ९) या भारतीयांचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान टिकवले आहे. अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.