भारत विरुद्ध न्यूझीलंड ( India vs New Zealand) यांच्यात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा फायनल सामना सुरू आहे ( ICC World Test Championship Final). आज या कसोटीचा अखेरचा दिवस आहे आणि भारतीय संघानं दुसऱ्या डावात मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. या कसोटी सामन्याचा निकाल कोणाच्याही बाजूनं लागू शकतो. सध्यातरी भारतीय संघाची बाजू वरचढ दिसत आहे आणि कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा खिंड लढवत आहे. अशात भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यानं आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ( Ravindra Jadeja is now the new No.1 Ranked All Rounder in Test Cricket)
भारतानं फायनल सामन्यात आर अश्विन व जडेजा या दोन्ही प्रमुख फिरकीपटूंना मैदानावर उतरवले, परंतु त्यांना गोलंदाजी करण्याची जास्त संधी मिळाली नाही. या आर अश्विननं दोन, तर जडेजानं एक विकेट घेतली आहे. जडेजानं पहिल्या डावात ७.२ षटकांत २० धावा देत एक विकेट घेतली. त्यानं टीम साऊदीला बाद केले. जडेजानं पहिल्या डावात १५ धावाही केल्या. आयसीसीनं बुधवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत जडेजा ३८६ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्यानं वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला ( ३८४) मागे टाकले. बेन स्टोक्स ( ३७७) व आर अश्विन ( ३५३) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील निराशाजन कामगिरीचा होल्डरला फटका बसला. त्यानं या मालिकेत ३४ धावा केल्या आणि ६ विकेट्स घेतल्या.
फलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक यानं टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नाबाद १४१ धावांची खेळी केली. तेच दुसऱ्या कसोटीत त्यानं ९६ धावा केल्या. या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही डी कॉकनं पटकावला. पाकिस्तानच्या बाबर आझमला ११व्या स्थानावर ढकलून तो स्वतः दहाव्या क्रमांकावर आला आहे.