ICC Mens U19 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर अंडर-१९ वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज भारत आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने मोठा विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३०१ धावा केल्या. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ अवघ्या १०० धावा करू शकला. भारताने २०१ धावांनी मोठा विजय साकारला.
तत्पुर्वी, भारताकडून मुशीर खानने सर्वाधिक ११८ धावांची शतकी खेळी केली. त्याने ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०६ चेंडूत ११८ धावा केल्या. याशिवाय कर्णधार उदय सहरनने ७५ धावांची सावध खेळी केली. भारताने सांघिक खेळीच्या जोरावर आयर्लंडला विजयासाठी ३०२ धावांचे तगडे आव्हान दिले होते.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ चीतपट झाला. Daniel Forkin (२७) वगळता एकाही आयर्लंडच्या फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. अखेर २९.४ षटकांत आयर्लंडने सर्वबाद १०० धावा केल्या अन् सामना मोठ्या फरकाने गमावला. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घाम फोडताना भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली. भारताकडून नमन तिवारीने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर Saumy Pandey (३) आणि धनुष गौडा (१), अभिषेक आणि उदय सहरन यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
भारताचा दबदबा नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात काही खास झाली नव्हती. आदर्श सिंग (१७) आणि अर्शित कुलकर्णी (३२) हे भारतीय सलामीवीर साजेशी खेळी करून माघारी परतले. मग मुशीर खान आणि उदय सहरन यांनी मोठी भागीदारी नोंदवली. त्यांनी १५१ चेंडूत १५६ धावांची भागीदारी केली आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. अखेरच्या काही षटकांमध्ये सचिन दासने ९ चेंडूत २१ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली.