ICC ODI Ranking : भारत-इंग्लंड वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंना ICC ODI Ranking मध्ये लाभ झालेला पाहायला मिळतोय.. याला विराट कोहली ( Virat Kohli) व जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) अपवाद ठरले आहेत. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वन डे क्रमवारीत जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) गोलंदाजांमधील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात बुमराह दुखापतीमुळे खेळला नव्हता आणि त्यामुळे आता न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट नंबर वन झाला आहे.
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल याने 4 स्थानांच्या सुधारणेसह 16वा क्रमांक पटकावला आहे, तर हार्दिक पांड्याने 13 स्थानांची झेप घेत अष्टपैलू खेळाडूंमध्ये 8वे स्थान पटकावले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चहलने 7 विकेट्स घेतल्या होत्या, तर हार्दिकने फलंदाजी व गोलंदाजीत कमाल दाखवताना 6 विकेट्स व 100 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याला चार स्थानांचा फटका बसला आहे आणि तो टॉप 10 मधून बाहेर गेला आहे. ख्रिस वोक्सही सहाव्या स्थानी घसरला असून कॉलिन डी ग्रँडहोम पाचव्या क्रमांकावर सरकला आहे.रिषभ पंतने 52 क्रमांकावरून थेट 25व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात रिषभने 125 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती.
इंग्लंडविरुद्ध कालच शतकी खेळी करणाऱ्या रॅसी व्हॅन डेर डुसेन तिसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने विराट कोहलीला चौथ्या स्थानी ढकलेल. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम अव्वल स्थानावर कायम आहे. रोहित शर्मा पाचव्या,क्विंटन डी कॉक सहाव्या स्थानावर आहे.