Shubman Gill, ICC ODI Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या वन डे क्रमवारीत भारताचा सलामीवीर शुबमन गिल ४५ स्थानांची झेप घेत ३८ व्या स्थानी विराजमान झाला. वेस्ट इंडिज पाठोपाठ झिम्बाब्वे दौऱ्यावर वन डे सामन्यांत मिळालेल्या संधीचं शुबमन गिलने ( Shubman Gill) सोनं केलं. गिलनं आतापर्यंत ९ वन डे सामन्यांत ७१.२८च्या ४९९ धावा केल्या आहे. विंडीज दौऱ्यावर ९८ धावांवर खेळत असताना पावसाचे आगमन झाले अन् गिलला शतक पूर्ण करता आले नाही. त्याची भरपाई त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर केली आणि ९७ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारांसह १३० धावांची खेळी केली. भारताने तिसरा वन डे सामना १३ धावांनी जिंकून मालिका ३-० अशी खिशात घातली. त्यामुळे गिलला क्रमवारीत फायदा झाला.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ७४४ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माही सहाव्या स्थानावर कायम आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांत १५४ धावा केल्या असूनही अनुभवी सलामीवीर शिखर धवनची १२व्या क्रमांकावर घसरण झाली. पहिल्या आणि तिसऱ्या वनडेत त्याने अर्धशतके झळकावली होती.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम वन डे फलंदाजी क्रमवारीत एकूण ८९१ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा रसी व्हॅन डर डुसेन आहे. त्याच्या नावावर ७८९ रेटिंग गुण आहेत. गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशचा शाकिब अल हसन अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.