आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीचा स्मृती मानधनाला मोठा फायदा झाला आहे. आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीत ती आता दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. स्मृती मानधनानं आयर्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत धमाकेदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे ४१ आणि ७३ धावांची खेळी केल्यावर तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत तिच्या भात्यातून १३५ धावांची खेळी आली होती. या खेळीसह अनेक विक्रम तिच्या नावे झाले. एवढेच नाही तर आता वनडे रँकिंगमध्ये ती दुसऱ्या स्थानावर पोहचलीये.
स्मृतीची नंबर वनच्या दिशेनं वाटचाल
स्मृती मानधना ही टॉप १० मध्ये असणारी एकमेव भारतीय आहे. तिच्या खात्यात ७३८ गुण जमा आहेत. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड ७७३ गुणांसह महिला वनडे रँकिंगमध्ये टॉपला आहे. स्मृतीच्या पाठोपाठ श्रीलंकेची चामारी अट्टापटू ७३३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
जेमिमा रॉड्रिग्सलाही झाला फायदा
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जेमिमा रॉड्रिग्ज हिने वनडे कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक झळकावलं होते. या कामगिरीचा तिलाही क्रमवारीत फायदा मिळाला आहे. दोन स्थानांनी आगेकूच करत ती आता १७ व्या स्थानावर पोहचली आहे. भारतीय महिला संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर ही आयसीसी महिला वनडे क्रमवारीत १५ व्या स्थानी आहे.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑलराउंडरच्या टॉप १० मध्ये दीप्तीचा लागतो नंबर
भारतीय महिला संघातील ऑलराउंडर दीप्ती शर्मा ३४४ गुणांसह ऑलराउंडरच्या यादीत ६ व्या क्रमांकावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाची अॅश्ले गार्डनर अव्वलस्थानी आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत, सोफी एक्लेस्टोन अव्वल स्थानावर आहे, तर दीप्ती ६८० रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.