India vs Pakistan : आशिया चषक 2022 स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यांची सर्वांनाच उत्सुकता आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2021नंतर प्रथमच हे दोन संघ समोरासमोर येणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. पण, आयसीसीनं या स्पर्धेपूर्वीच भारत-पाकिस्तान यांच्यात चढाओढीचा सामना सुरू केला आहे.
भारतीय संघाने लोकेश राहुल याच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वे विरुद्धची वन डे मालिका 3-0 अशी जिंकली, तर दुसरीकडे पाकिस्ताननेही नेदरलँड्सवर 3-0 असा विजय मिळवला. त्यामुळे ICC ODI Team Rankingsमध्ये दोन्ही संघांना फायदा झाला आहे. ताज्या रँकींगनुसार भारत 111 रेटींग पॉइंटसह तिसऱ्या, तर पाकिस्तान 107 रेटींग पॉइंटसह चौथ्या क्रमांकावर आहे.
या मालिका विजयाचा दोन्ही संघाना पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग गुणतालिकेतही फायदा झाला आहे. न्यूझीलंड ( 124) व इंग्लंड (119) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. भारतीय संघाला वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी आहे. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेनंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
ट्वेंटी-20 क्रमवारीत भारत 270 रेटींग पॉइंटसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंड ( 262) व पाकिस्तान ( 261) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कसोटीत ऑस्ट्रेलिया ( 128), भारत ( 114) व दक्षिण आफ्रिका ( 110) हे टॉप थ्री संघ आहेत.