ICC ODI WC Super League Standings : रिसी टॉप्लीच्या भेदक मारा करताना सहा विकेट्स घेत इंग्लंडला दुसऱ्या वन डे सामन्यात भारतावर १०० धावांनी विजय मिळवून दिला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. टॉप्लीने २४ धावांत ६ विकेट्स घेताना वन डे क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाचा विक्रम नावावर केला. या विजयानंतर इंग्लंडने आयसीसी वन डे वर्ल्ड कप सुपर लीग गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. पण, बांगलादेशला शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सामन्यात तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून, हे अव्वल स्थान हिस्कावण्याची संधी आहे.
इंग्लंडच्या २४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ १४६ धावांत तंबूत परतला. रविवारी भारत-इंग्लंड यांच्यातला तिसरा सामना मँचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आपले स्थान पक्के करण्यासाठी आयसीसी वन डे वर्ल्ड कप सुपर लीगमधील स्थान हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक संघाला एका विजयासाठी १० गुण मिळतात, तर बरोबरीचा किंवा अनिर्णित निकालाचा किंवा सामना रद्द झाल्यास प्रत्येक संघाला पाच गुण, परंतु पराभूत संघाला एकही गुण मिळत नाही. इंग्लंड १२५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, त्यापाठोपाठ बांगलादेश ( १२०), अफगाणिस्तान ( १००), पाकिस्तान ( ९०), न्यूझीलंड ( ८०), वेस्ट इंडिज ( ८०), भारत ( ७९), ऑस्ट्रेलिया ( ७०) व आयर्लंड ( ६८) असे अव्वल नऊ संघ आहेत.
ICC ODI WC Super League Standings मधील अव्वल ८ संघ वर्ल्ड कप २०२३मध्ये थेट पात्र ठरणार आहेत. उर्वरित संघाला आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत पाच संलग्न संघांसह खेळावे लागेल आणि त्यापैकी दोन संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. दक्षिण आफ्रिकने स्थानिक ट्वेंटी-२०ला महत्त्व देताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न जाण्याच्या निर्णय घेतला आणि याचा फटका त्यांना वन डे वर्ल्ड कपच्या पात्रतेत बसणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत न खेळल्यामुळे आफ्रिकेला ३० गुणांवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यांच्या उर्वरित मालिका भारत व इंग्लंडविरुद्ध आहेत आणि नेदरलँड्सविरुद्ध दोन सामने होणार आहेत.
भारत यजमान असल्यामुळे ते थेट पात्र ठरले आहेत. त्यामुळे या क्रमवारीत ते कोणत्याही स्थानावर असले तरी त्याचा फार फरक पडणार नाही.