Join us  

४६ दिवस, १० संघ, ४८ सामने; आजपासून क्रिकेटचा महासंग्राम, पहिला सामना Eng Vs NZ

ICC ODI World Cup 2023: भारतीय संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 12:14 PM

Open in App

क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेल्या आयसीसी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेला आज अहमदाबाद येथून सुरुवात होईल. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे रंगणार आहे. विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत एकूण ४५ सामने होतील. प्रत्येक संघ इतर नऊ संघांशी राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळेल. अव्वल चार संघ बाद फेरीसाठी (उपांत्य फेरी) पात्र ठरतील. यानंतर पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहे. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. याआधी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करून २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तसेच ईडन गार्डन्सवर १९८७ च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात विजेतेपदाचा सामना झाला होता, जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

वर्ल्ड कप २०२३मध्ये राखीव दिवस कधी आहेत?

विश्वचषक २०२३चा पहिला उपांत्य सामना बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत होईल आणि दुसरा उपांत्य सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथे होईल. दोन्ही उपांत्य फेरीत राखीव दिवस असेल. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून २० नोव्हेंबर हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. तिन्ही बाद फेरीचे सामने दिवस-रात्रीचे असतील, जे स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होतील. या विश्वचषकादरम्यान दिवसा खेळले जाणारे सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरू होतील. स्पर्धेत दिवसभरात (सकाळी १०.३० पासून) ६ सामने खेळवले जातील, तर उर्वरित सामने दिवसरात्र (दुपारी २ वाजल्यापासून) खेळले जातील.

विश्वचषक २०२३ चे सामने या मैदानांवर होणार-

विश्वचषकाचे सर्व सामने एकूण १० ठिकाणी खेळवले जातील. यामध्ये हैदराबाद, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई, धर्मशाला, कोलकाता यांचा समावेश आहे.

भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक

८ ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई११ ऑक्टोबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान दिल्ली१४ ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद१९ ऑक्टोबर- भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे२२ ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला२९ ऑक्टोबर- भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ२ नोव्हेंबर- भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई५ नोव्हेंबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता१२ नोव्हेंबर- भारत विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयसीसी