वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना होऊन एक आठवडा उलटला. मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांसह खेळाडू देखील भावूक झाले. ही झळ भारतीय चाहत्यांच्या मनात कायम आहे. पण, सलग १० दहा सामने जिंकणारा भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या संघाची पाठराखण केली. चाहत्यांसह अनेकांनी खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने सर्वोत्तम संघ न जिंकल्याचा दावा केला. संपूर्ण विश्वचषकात अपराजित राहिल्यानंतर भारतीय संघाकडे स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे अनेकांच्या मनात बेस्ट संघ म्हणून रोहितसेनाच आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीरने माध्यमांशी बोलताना एक वेगळे मत मांडले. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट खेळला, त्यांनी खरोखरच चांगले क्रिकेट खेळले पण विश्वचषक जिंकतो तो संघ सर्वोत्तम असतो, असे गंभीरने सांगितले. तसेच बऱ्याच लोकांनी भारतीय संघाला सर्वोत्तम संघ म्हणून संबोधले आणि सर्वोत्तम संघच विश्वचषक जिंकला नाही, अशा शब्दांत आपल्या संघाच्या खेळीला दाद दिली. पण, मला वाटते मी याबद्दल अगदी स्पष्ट असून सर्वोत्तम (ऑस्ट्रेलिया) संघानेच विश्वचषक उंचावला.
भारताच्या तोंडचा घास पळवून ऑस्ट्रेलिया जग्गजेता
भारतीय संघाने यंदाच्या पर्वात ऑस्ट्रेलियालाच नमवून विजयी सलामी दिली होती. त्यानंतर भारताने आपला विजयरथ कायम ठेवला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पण, किताबापासून एक पाऊल दूर असताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाने तमाम भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी विजय मिळवून विश्वचषक उंचावला.
अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.