mohammed shami on mitchell marsh : वन डे विश्वचषक भारतीय संघाने गाजवला मात्र शेवट यजमानांना हवा तसा झाला नाही. अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. उपांत्य फेरीपर्यंत अपराजित राहिलेल्या टीम इंडियाला किताबापासून एक पाऊल दूर राहावे लागले. अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला आणि तमाम भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
ऑस्ट्रेलियाने विश्वचषक उंचावल्यानंतर कुठे हसू तर कुठे अश्रू असे चित्र होते. कांगारूंनी मोठा जल्लोष केला. तर ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शचा एक फोटो क्रिकेट विश्वाला दुखवून गेला. मार्शने विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. आता या फोटोवरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन खेळाडूला लक्ष्य केले.
मार्शचा हा फोटो पाहून वाईट वाटते - शमीयंदाच्या पर्वात मोहम्मद शमीने सर्वाधिक २४ बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. शमी त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पोहचल्यानंतर स्थानिक पत्रकारांनी त्याच्याशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना शमीने मिचेल मार्शच्या व्हायरल फोटोवर भाष्य केले. "मिचेल मार्शचा ट्रॉफीसोबतचा असा फोटो पाहून मला वाईट वाटते. ही तिच ट्रॉफी आहे जिच्यासाठी जगभरातील संघ भिडत होते, जिंकल्यावर तिला डोक्यावर घेऊन मिरवायचं होतं, पण मार्शने तिच्यावर पाय ठेवला... हे पाहून खरंच खूप वाईट वाटलं", असे शमीने सांगितले.
किताबाच्या लढतीत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.