नवी दिल्ली : वन डे विश्वचषकात सोमवारी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. सलगच्या दोन पराभवानंतर पाकिस्तानी संघ सोमवारी अफगाणिस्तानशी भिडणार आहे. वन डे विश्वचषकातील २२ वा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करून आपली गाडी विजयाच्या रूळावर आणण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे. पण, अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करून शेजाऱ्यांच्या पोटात गोळा आणल्याचे दिसते. कारण पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीज राजाने देखील अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानविरूद्ध मजबूत असेल असे म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि बोर्डाचा माजी अध्यक्ष रमीज राझाने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्याने सांगितले की, विजयाच्या पटरीवर येऊन नवीन सुरूवात करणे आता पाकिस्तानसाठी कठीण आहे. चेन्नईत काहीही होऊ शकते त्यांचा पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी चांगली असल्याने फिरकीविरुद्ध पाकिस्तानच्या फलंदाजांची अग्निपरीक्षा असेल. त्यामुळे मला वाटते की, चेन्नईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळाली तर अफगाणिस्तान फेव्हरेट असेल.
पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्गपाकिस्तानला उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी उरलेले सर्व पाच सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. एका सामन्यातील पराभवामुळे देखील पाकिस्तानचा खेळ बिघडू शकतो. उरलेले पाचही सामने जिंकल्यास पाकिस्तानचे एकूण गुण १४ होतील, ज्यामुळे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहील. दरम्यान, पाकिस्तानने ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवल्यास देखील पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. कारण ४ सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानचे गुण १२ होतील. मात्र, त्यासाठी पाकिस्तानला आपल्या नेटरनरेटमध्ये सुधारणा करावी लागेल.