वन डे विश्वचषक भारतात होतोय, पण भारतीयांचे क्रिकेटप्रती प्रेम आटलेले पाहायला मिळतेय... विश्वचषक स्पर्धेच्या तिकिटांची विक्री सुरू झाली तेव्हा सर्व सामन्यांचे तिकीटं सोल्ड आऊट झालेली दिसली. पण, वस्तुस्थिती काही वेगळी दिसतेय... त्यात भारत-पाकिस्तान सामन्यात आलेले प्रेक्षक खरंच क्रिकेट चाहते होते की 'Real' च्या दुनियेतून Real Life मध्ये आलेली पात्र होती, हा प्रश्न कमी चिंता सतावतेय... पाकिस्तानी खेळाडूंना पाहून जय श्री रामचा नारा देणं... बाबर आझमला उगाच डिवचलं... मोहम्मद रिझवानने नमाज पठण केल्याने त्याच्याविरोधात न्यायालयात धाव घेणं... हे याआधी कधी घडल्याचे आठवणीत नाही. त्यात भारत-पाकिस्तान सामना वगळता अन्य लढतींकडे चाहत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसतेय. त्यामुळे हा विश्वचषक सध्यातरी फसलेला दिसतोय...
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी जरी असला तरी 'क्रिकेट'ला भारतीयांनी भरभरून प्रेम दिलं. भारतात क्रिकेट म्हणजे जणू काही प्रसिद्धीचं केंद्रच आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा क्रिकेटमध्ये रस असल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडसारख्या मोठ्या इंडस्ट्रीचे धागे देखील क्रिकेटशी जोडले आहेत. आयुष्याचा खडतर प्रवास घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या कित्येकांनी यामाध्यमातून प्रसिद्धीचे शिखर गाठले. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या या खेळात भारतीयांनी चांगलाच जम बसवला. दरम्यान, आशियाई देशांमध्ये युरोपीय देशांच्या तुलनेत क्रिकेटचे वेड जरा जास्तच आहे. युद्धभूमीवर एकमेकांशी दोन हात करणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांना याच खेळाने जवळ आणले आणि वरचढ कोण हे दाखवून देण्याचं नवं व्यासपीठ दिलं. याच क्रिकेटचा महामेळावा अर्थात वन डे विश्वचषक सध्या भारतात सुरू आहे. स्पर्धेला सुरूवात होऊन जवळपास पंधरा दिवस उलटले पण वातावरण निर्मिती करण्यात मात्र आयोजकांना अपयश आल्याचे दिसते. यजमान भारतीय संघाचे सामने वगळता इतर संघांच्या सामन्यांमध्ये फारसा कोणाला रस नाही. साहजिकच भारतीय चाहते आपल्या संघाला पाठिंबा देतायत... पण, क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट व्यतिरिक्त नकोसा थरार रंगल्याने आयसीसीसहबीसीसीआयची चिंता वाढेल यात काही शंका नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असले तरी आयोजनाच्या बाबतीत बीसीसीआयने भारतीयांचा अपेक्षाभंगच केला असे म्हटले कर वावगे ठरणार नाही. विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यातच याचा प्रत्यय पाहायला मिळाला.
गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलामीचा सामना पार पडला. सव्वा लाख प्रेक्षक क्षमता असलेले हे मैदान मात्र माळरानासारखे मोकळे दिसले. जिकडे तिकडे केवळ मोकळ्या खुर्च्या अन् ग्राउंड स्टाफचे जाळे होते. या सामन्याकडे प्रेक्षकांनी असे दुर्लक्ष केले की, सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या खटकणाऱ्या भूमिकेकडे विरोधकांंनी पाठ फिरवावी. ओपनिंग सेरेमनी नसल्याने काहीच वातावरणनिर्मिती झाली नाही. किंबहुना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत असल्याचे जाणवलेही नाही. याला कारणीभूत नक्की कोण याबाबात भाष्य केले तर, प्रश्नांची मालिका सुरू होईल हे नक्की. तब्बल १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषक होत असताना देखील प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने आयसीसीसह बीसीसीआयची चिंता वाढली. याला अद्यापतरी केवळ टीम इंडियाच्या सामन्यांचा अपवाद आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव करून घरच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईत पार पडला, तिथे प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली पण इतर मैदानं खालीच दिसली. भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार म्हटलं की, या लढतीची उत्सुकता काहीशी वेगळीच असते. म्हणूनच विक्रमी सव्वा लाखांच्या संख्येने नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांची यात्रा भरली. बीसीसीआयचे ऑफिशियल तिकिट पार्टनर BookMyShowवर होत असलेला तिकिटांचा गोंधळ उघड आहे. पहिल्या सामन्यासाठी सर्व तिकिटांची विक्री झाली असल्याचे सांगण्यात आले होते. कालांतराने 'हाउसफुल' पण मैदानात प्रेक्षकांचा 'दुष्काळ' अशी फजिती झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी संताप व्यक्त केला पण यामागील कारण अद्याप अनुत्तरितच आहे.
तिकिटांचा भोंगळ कारभारइंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यापूर्वीच तिकिटं 'हाउसफुल' असल्याची अफवा का पसरवली गेली असा सूर चाहत्यांमध्ये पसरला. पहिल्याच सामन्यात मोजकेच प्रेक्षक दिसल्याने आयोजकांची फजिती उडाली. दुसरीकडे, BookMyShowवर मात्र सर्व तिकिटे sold out झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच हाउसफुल पण स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा दुष्काळ अशी स्थिती उद्भवली. हा गोंधळ सुरू असतानाच इंडियन एक्सप्रेस या इंग्लिश वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीने खळबळ माजली. गुजरातमधील स्थानिक राजकीय मंडळींनी जवळपास ३० ते ४० हजार महिलांना विश्वचषक सलामीच्या सामन्यासाठी अल्पोपाहारासह मोफत तिकिटे दिल्याचा दावा करण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले असले तरी नियमांना डावलून असा काळाबाजार कोणी केला हा प्रश्न उपस्थित झाला. कारण BookMyShow वर भारताच्या सामन्यांसाठी जास्तीत जास्त दोन आणि गैर-भारतीय सामन्यांसाठी चार तिकिटे बुक करण्याची मुभा आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यासाठी बुक झालेली एवढी तिकिटे कोणाच्या मालकीची होती? याबाबत स्पष्ट माहिती समोर येणे गरजेचे आहे.
धार्मिक प्रार्थना पण वाद चिघळलानवख्या नेदरलॅंड्सचा पराभव करून पाकिस्तानने विजयी सुरूवात केली. ६ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या या सामन्यात यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने केलेली एक कृती त्याची अडचण वाढवून गेली. खरं तर अद्याप आयसीसी किंवा बीसीसीआयने याबाबत ठोस भूमिका घेतली नसली तरी प्रकरण कोर्टात गेले आहे. लंचदरम्यान रिझवानने मैदातान नमाज अदा करताच भारतीय वकील विनीत जिंदल यांनी रिझवानविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. रिझवानच्या या वर्तनानंतर आयसीसीकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या प्रती आयसीसी एथिक्स कमिटी, बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रिझवानवर कारवाई होणार का हे पाहण्याजोगे असेल.
पाहुण्यांचा 'असा'ही पाहुणचारमागील वर्षभर चाललेल्या वादानंतर अखेर पाकिस्तानी संघ भारतात आला. तब्बल सात वर्षांनंतर भारतीय भूमीवर उतरलेल्या शेजाऱ्यांचे हैदराबाद विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. शेजाऱ्यांनी देखील चांगली सुरूवात करत नेदरलॅंड्स आणि श्रीलंकेचा पराभव करून सलग दोन विजय मिळवले. परंतु, भारताविरूद्धच्या सामन्यात मात्र बाबर आझमचा संघ चीतपट झाला. रोहितसेनेने दारूण पराभव केल्यानंतर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर भारत विरूद्ध पाकिस्तान असे शाब्दिक युद्ध रंगले. पण, यावेळी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला चाहत्यांनी प्रत्यक्षात लक्ष्य केले. पाक संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर काही प्रेक्षकांनी किंबहुना अतिउत्साही चाहत्यांनी बाबरला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला.
IND vs PAK सामन्यादरम्यान नकोसा 'थरार'१४ तारखेला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले अन् तूर्तास प्रेक्षकांचा दुष्काळ हा डाग पुसून गेला. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख प्रेक्षकांनी उपस्थिती दाखवली. एकतर्फी सामन्यात मोठा विजय मिळवून कर्णधार रोहितने 'हिट' शो केला. या सामन्यादरम्यान काही नाट्यमय घडामोडी देखील घडल्या. मग त्यामध्ये हार्दिक पांड्याने केलेला मंत्र असो की किंग कोहलीने हातावर घड्याळ नसताना पाहिलेला वेळ असो. यांमुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. पण, सामन्याच्या शेवटी स्पर्धेला आणि खिलाडीवृत्तीला डाग लागेल असेच काहीसे पाहायला मिळाले. पाकिस्तानी खेळाडू रिझवानसमोर काही अतिउत्साही प्रेक्षकांनी 'जय श्री राम'चे नारे लगावले. रिझवानने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात मैदानात नमाज अदा केली होती. याशिवाय श्रीलंकेविरूद्धच्या विजयानंतर आपली शतकी खेळी गाझामधील इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धातील पीडितांना समर्पित केल्याने पाक खेळाडूला चाहत्यांच्या या आक्रोशाला सामोरे जावे लागल्याचे सांगितले जात आहे. पण, एवढ्या मोठ्या स्पर्धेत क्रिकेटशिवाय नको त्या गोष्टी घडत असल्याने ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. सर्वाधिक वेळा विश्वचषक उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला म्हणून की वन डे क्रिकेट कंटाळवाणे होत असल्याने यंदा मजा नसलेला 'वर्ल्ड कप' होतोय की काय अशी भावना क्रिकेटप्रेमींमध्ये आहे. परंतु, क्रिकेट पलीकडचाच हा 'थरार' एका क्रिकेटप्रेमी राष्ट्रासाठी नक्कीच नकोसा आहे.