सध्या सुरू असलेला वन डे विश्वचषक म्हणजे पाकिस्तानी संघासाठी एक वाईट स्वप्नच. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मिळवलेल्या विजयानंतर पाकिस्तानची गाडी रूळावरून घसरली. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्याकडून शेजाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता नव्या उमेदीने बाबर आझमचा संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मैदानात उतरेल. मात्र, या सामन्याच्या तोंडावरच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. कारण वेगवान गोलंदाज हसन अली आगामी सामन्याला मुकणार आहे. ताप येत असल्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित सामन्यांपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला विश्रांती दिली गेली असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले.
शुक्रवारी चेन्नईत दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान असा सामना होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या सल्ल्यानुसार हसन अलीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद वसिमला संघात स्थान मिळू शकते. पाकिस्तानने नेदरलॅंड्स आणि श्रीलंकेला पराभूत करून विजयाची गाडी पकडली होती. पण, भारताने त्यांचा विजयरथ रोखून शेजाऱ्यांचा दारूण पराभव केला. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना पाकिस्तानसाठी 'करा किंवा मरा' असा असणार आहे.
विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.