Join us  

वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या लढतीची तारीख पुन्हा बदलणार; BCCI वर दडपण, जगभरात नाचक्की

ICC ODI World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ४५ साखळी सामन्यांपैकी ९ सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 4:23 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ४५ साखळी सामन्यांपैकी ९ सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या. त्यामुळे BCCI ची जगभरात नाचक्की झाली. या सुधारणा केल्यानंतरही बीसीसीआयसमोर नवं संकट उभं राहिलं आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल केले जात आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला आता जेमतेम ५० दिवस शिल्लक राहिले असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने ( HCA) वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे. बीसीसीआयवर त्यामुळे प्रचंड दडपण निर्माण झाले आहे. 

वर्ल्ड कप स्पर्धेच्या तिकीट विक्रिसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे आणि येत्या काही दिवसांत ऑनलाईन विक्रीलाही सुरूवात होणार आहे, परंतु वेळापत्रकाचा तिढा गुंतागुंतीचा होत चालला आहे.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार HCA ने बीसीसीआयला पत्र पाठवून त्यांच्या स्टेडियमवर होणाऱ्या सलग दोन सामन्यांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातला सामना १० ऑक्टोबरला उप्पल येथील राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे आणि त्याच्या बरोबर एक दिवस आधी नेदरलँड्स विरुद्ध न्यूझीलंड ही लढत याच स्टेडियमवर होणार आहे. याआधीच्या वेळापत्रकानुसार पाकिस्तानचा सामना १२ ऑक्टोबरला होणार होता, परंतु भारत-पाकिस्तान यांच्यातली अहमदाबाद येथे होणारी लढत १४ ऑक्टोबरला खेळवण्याचा निर्णय झाल्याने आधीच्या तारखेतही बदल झाला.  

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने तारखा बदलण्याची मागणी का केली, याचे उत्तर मिळालेले नाही. पण, जेव्हा बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक जाहीर केले, तेव्हा HCA च्या कोणत्याही अधिकाऱ्याला विश्वासात घेतले नाही. त्यात ९ व १० ऑक्टोबर असे सलग सामने असल्याने हैदराबाद पोलिसांनी सलग दोन दिवशी सुरक्षा पुरविणे शक्य नसल्याचे HCA ला कळवले. विशेषतः पाकिस्तानचा सामना असल्याने पोलिसांची धावपळ होणार आहे. पाकिस्तानच्या संघाला सुरक्षा पुरविण्यासाठी मोठ्या संख्ये पोलिस अधिकारी हॉटेल बाहेर असतील. जवळपास ३००० पोलीस एका सामन्यासाठी सुरक्षेसाठी असणार आहेत. पोलिसांच्या विनंतीनुसार न्यूझीलंड वि. नेदरलँड्स सामना नियोजित तारखेला झाल्यास हरकत नाही, परंतु पाकिस्तानच्या लढतीला सुरक्षा पुरविणे शक्य नसल्याचे कळवण्यात आले आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपबीसीसीआयहैदराबाद
Open in App