R Ashwin on Virat Kohli Catch Drop : विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली. लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला. भारताचा स्टार अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनला चालू विश्वचषकात संधी मिळाली आहे. खरं तर अश्विनने भारताची फलंदाजी एकाच जागेवर बसून पाहिल्याने एकच चर्चा रंगली. याबाबत खुद्द अश्विनने सांगितले असून विराट कोहलीचा झेल सुटल्यानंतरचा थरार त्याने नमूद केला. अश्विनने सांगितले की, भारतीय संघाचे सलग तीन फलंदाज बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा १२ धावांवर असताना एक झेल सुटला. विराट बाद होण्यापासून वाचल्यानंतर तो जागेवरून हललाच नाही.
सामन्यानंतर बोलताना अश्विनने म्हटले, "विराट कोहलीचा झेल हवेत गेल्याचे पाहिल्यावर मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत सुटलो. तेव्हा मी विचार करत होतो की, एवढं सगळं संपल्यावरच जागं व्हावं. मग मला प्रेक्षकांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि मी ड्रेसिंग रूममध्ये परतलो. त्यानंतर मी संपूर्ण सामना त्याच ठिकाणाहून पाहिला. त्यामुळे माझ्या पायांना आता त्रास जाणवत आहे."
विराटचा झेल कांगारूंना पडला महागात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला चांगलाच संघर्ष करावा लागला. सुरूवातीलाच कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यरच्या रूपात तीन मोठे झटके बसल्यानंतर विराट-राहुलने डाव सावरला. पण, १२ धावांवर खेळत असताना विराटला एक झेल सुटला अन् भारतीय चाहत्यांना सुखद धक्का बसला. मिचेल स्टार्कने कोहलीला आपल्या जाळ्यात फसवले पण मिचेल मार्शला झेल घेण्यात अपयश आले. १२ धावांवर झेल सुटल्यानंतर किंग कोहलीने कांगारूंना घाम फोडताना ८५ धावांची अप्रतिम खेळी केली.
विराट कोहली (८५) आणि लोकेश राहुल नाबाद (८५) यांच्या सावध खेळीच्या जोरावर भारताने २०० धावांचे लक्ष्य सहज गाठले. ४१.२ षटकांत चार बाद २०१ धावा करून भारताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. लोकेश राहुलने विजयी षटकार लगावला पण त्याला शतक झळकावण्यात अपयश आले. चौकार ठोकण्याच्या प्रयत्नात असलेल्या राहुलने षटकार ठोकला अन् शतकाच्या आशा मावळल्या. अखेर भारताने ६ गडी आणि ५२ चेंडू राखून पहिला विजय साकारला.