ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुबमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ८८ धावा जोडल्या. रोहितचे अर्धशतक दोन धावांनी हुकले, तर गिल अर्धशतकानंतर लगेचच सीमारेषेवर झेलबाद होऊन माघारी परतला. पण, विराट कोहली ( Virat Kohli) मैदानावर येताच स्टेडियम त्याच्या नावाने दणाणून निघाले. त्याने दमदार खेळ करून आज मोठा पल्ला सर केला.
रोहित शर्माने पाडला विक्रमांचा पाऊस! यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये केल्यात सर्वाधिक धावा अन्...
बांगलादेशविरुद्ध रोहितची बॅट तळपतेच आणि आजही तेच पाहायला मिळाले. हिटमॅनने चौकाराने सुरुवात केली आणि चांगले झोडून काढले. वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक ७५०* धावांचा विक्रम आज रोहितने नावावर करताना शाकिब अल हसनचा ( ७४३) विक्रम मोडला. कॅलेंडर वर्षात ( २०२३) सर्वाधिक ६१ षटकार मारण्याचा विक्रमही रोहितने नावावर करताना इयॉन मॉर्गनचा ६० ( २०१९) षटकारांचा विक्रम मोडला. हसन महमुदच्या बाऊन्सनवर रोहितचा पुलशॉट फसला अन् हिटमॅनला ४० चेंडूंत ४८ धावांवर माघारी जावे लागले. त्यात ७ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. शुबमनसह त्याने १२.४ षटकांत ८८ धावा जोडल्या. महमुदच्या त्याच षटकात विराट कोहलीने २३ धावा चोपून काढल्या. शुबमनने ५२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मेहिदी मिराझच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गिल ( ५३) झेलबाद झाला. महमुदुल्लाने सीमारेषेवर चांगला झेल घेतला अन् गिल-विराटची ४४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विराटने मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले. विराटने २५,९६० धावा करून ( ५६७ इनिंग्ज) श्रीलंकेचा दिग्गज माहेला जयवर्धनेचा २५,९५७ ( ७२५ इनिंग्ज) धावांचा विक्रम मोडला. सचिन तेंडुलकर ३४,३५७ धावा, कुमार संगकारा २८,०१६ धावा आणि रिकी पाँटिंग २७,४८३ धावा हे आघाडीवर आहेत.